मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एका खोचक व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान केलेल्या टीकेला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने व्यंगचित्राच्या (Caricature/Cartoon) माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून एक बोचरे व्यंगचित्र शेअर करत ठाकरेंच्या 'राजकीय पोटदुखीवर' खोचक भाष्य करण्यात आले आहे.
व्यंगचित्रात नक्की काय दाखवले आहे ?
शिवसेनेने शेअर केलेल्या या मार्मिक व्यंगचित्रात राजकीय परिस्थितीवर अत्यंत थेट भाष्य करण्यात आले आहे. व्यंगचित्रात एका टीव्ही स्क्रीनवर बातम्या सुरू असल्याचे दाखवले आहे. त्यावर 'ब्रेकिंग न्यूज: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये ३ पुरस्कारांनी सन्मान!' अशी हेडलाईन झळकत आहे. ही बातमी पाहताच टीव्हीसमोर बसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पोटात तीव्र कळा येत असल्याचे आणि ते वेदनेने हतबल झाल्याचे चित्र आहे. हतबल झालेले उद्धव ठाकरे टीव्ही बंद करायला सांगत, "बंद कर तो टीव्ही, पोटात कळ मारते माझ्या ह्यांची प्रगती बघून!" असा संवाद त्यांच्या तोंडी दाखवण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यातील टीकेला प्रत्युत्तर
'लंडनचे यश खुपते, म्हणून पोटात दुखते'
शिवसेनेच्या सोशल मीडिया टीमने हे व्यंगचित्र पोस्ट करताना दिलेले कॅप्शन आणि आशय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदेंना मिळालेले आंतरराष्ट्रीय यश विरोधकांच्या डोळ्यात कसे खुपत आहे, हेच या चित्राद्वारे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध उबाठा गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, आता एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्मिक व्यंगचित्रांचा आणि सोशल मीडिया वॉरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.