Sunday, September 20, 2026

Jharkhand Naxal Leader : वाराणसीत पोलिसांसोबत चकमक; 25 लाखांचा इनामी झारखंडचा नक्षलवादी कमांडर ठार

Jharkhand Naxal Leader : वाराणसीत पोलिसांसोबत चकमक; 25 लाखांचा इनामी झारखंडचा नक्षलवादी कमांडर ठार

वाराणसी : वाराणसीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत झारखंडमधील बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचा एक कमांडर ठार झाला आहे. रविवारी पहाटे रामनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. ब्रिजेश गंजू उर्फ गोपाल सिंग भोक्ता असे ठार झालेल्या कमांडरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंजू हा मोटारसायकलवरून आपल्या एका साथीदारासोबत तेगारा क्रॉसिंगहून रामनगरमार्गे मुघलसरायच्या दिशेने जात होता. यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याला अडवून अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंजूने पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गंजू गंभीर जखमी झाला.

या चकमकीत यूपी एटीएसचे उपअधीक्षक विपिन राय आणि हेड कॉन्स्टेबल नितेंद्र कृष्णा यांनाही गोळ्या लागल्या. मात्र, बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. चकमकीनंतर गंजूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तूल, एक कार्बाइन आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त केल्याची माहिती दिली आहे. गंजूविरोधात सुमारे 50 गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यापैकी दोन प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIAकडून करण्यात आला होता.

गंजूच्या अटकेसाठी झारखंड सरकारने 25 लाख रुपयांचे, तर NIAने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे त्याच्यावर एकूण 30 लाख रुपयांचे बक्षीस होते.

उत्तर प्रदेशचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजी अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंजूवर नागरिक आणि पोलिसांच्या हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते. त्याच्या मृत्यूनंतर टीपीसी संघटनेशी संबंधित इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >