Sunday, September 20, 2026

Aleema Khan Arrest : लाँग मार्चची धास्ती की दबावतंत्र? पाकिस्तानात इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना अटक

Aleema Khan Arrest : लाँग मार्चची धास्ती की दबावतंत्र? पाकिस्तानात इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना अटक

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून, आता त्यांच्या कुटुंबावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना लाहोरमधील त्यांच्या घराबाहेरून जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यासोबत तुरुंगात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि अमानुष वर्तनाविराधात अलीमा खान सातत्याने आक्रमकपणे आवाज उठवत होत्या. त्यांनी या मुद्द्यावर नुकतीच उघडपणे आपली भूमिका मांडली होती, त्यानंतर काही दिवसांतच शहबाज शरीफ सरकारच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.(Aleema Khan Arrest)

सार्वजनिक सुव्यवस्था कायद्यांतर्गत ३० दिवसांची नजरकैद/ताब्यात घेण्याचे आदेश

लाहोरच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा गुप्तचर समितीच्या बैठकीत शहरातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या नावाखाली अलीमा खान यांना ३० दिवसांसाठी ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासंदर्भातील कायद्यांतर्गत (MPO) हे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.(Aleema Khan Arrest)

दरम्यान, पंजाब पोलिसांनी अलीमा खान यांना त्यांच्या घराबाहेरून ताब्यात घेतले असले, तरी त्यांना आणि त्यांच्या चालकाला नेमके कुठे नेण्यात आले आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कायदेशीर प्रतिनिधींनी अलीमा खान यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत त्यांना कोणत्या कायदेशीर आधारावर अटक केली, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे.

२७ सप्टेंबरच्या लाँग मार्चपूर्वी कारवाईचा बडगा

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) पंजाबमधील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पीटीआयच्या प्रस्तावित लाँग मार्चपूर्वी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या तातडीच्या सुटकेची मागणी करण्यासाठी पीटीआयने या लाँग मार्चची हाक दिली आहे. या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी पक्षाच्या चार कार्यकर्त्यांनाही आधीच ताब्यात घेतले होते.(Aleema Khan Arrest)

इस्लामाबादमध्ये पोलीस यंत्रणा अलर्टवर

लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद पोलिसांनीही कारवाईला वेग दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी इस्लामाबादच्या केंद्रीय पोलिस कार्यालयात उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. यामध्ये आंदोलनाची तयारी, तसेच पीटीआयचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पीटीआय आक्रमक झाले असून, या राजकीय घडामोडींमुळे पाकिस्तानमधील वातावरण चांगलेच तापले आहे.(Aleema Khan Arrest)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >