Tuesday, November 3, 2026

Indian ship attacked in Oman sea : ओमानच्या समुद्रात भारतीय मालवाहू जहाजावर हवाई हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, १३ जण सुखरूप

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या घटनेची माहिती दिली आहे. 'अल युसुफी' (Al Jusufi) असे या भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाचे नाव असून, त्यावर एकूण १४ भारतीय नागरिक तैनात होते.

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय व्यापारी जहाजावर अचानक हवाई हल्ला झाल्याची अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, जहाजावरील उर्वरित १३ भारतीय नागरिक सुखरूप वाचले आहेत. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या घटनेची माहिती दिली आहे. 'अल युसुफी' (Al Jusufi) असे या भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाचे नाव असून, त्यावर एकूण १४ भारतीय नागरिक तैनात होते.

नेमकी घटना काय घडली ?

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अल युसुफी' हे जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना एका अज्ञात हवाई वस्तूने (ड्रोन किंवा क्षेपणास्त्राने) जहाजाला थेट धडक दिली. हल्ल्याची बातमी मिळताच ओमानच्या तटरक्षक दलाने त्वरित बचाव मोहीम राबवून १३ भारतीय खलाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत गुजरातचे रहिवासी असलेले गंधार नहिम अजीज हे गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पश्चिम आशियातील युद्धाचा फटका; आतापर्यंत २३ भारतीयांचा मृत्यू

पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आणि तणावामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर धोके वाढले आहेत. या ताज्या हल्ल्यामुळे या संघर्षात जीव गमावलेल्या भारतीय नागरिकांची संख्या आता २३ वर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जाण्यावर भारताने अनेकदा तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

मदतकार्य आणि पार्थिव भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू

ओमानमधील भारतीय दूतावास तेथील स्थानिक प्रशासन आणि ओमान सरकारच्या सतत संपर्कात आहे. सुखरूप वाचलेल्या १३ भारतीय कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. तसेच, मृत नाविकाचे पार्थिव सन्मानाने भारतात आणण्यासाठी आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्वदेशी परत पाठवण्यासाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (MEA) वेगाने कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत आहे.

भारत सरकारकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

या हल्ल्यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, "व्यापारी जहाजांना आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्तेला अशा प्रकारे लक्ष्य करणे अत्यंत चिंतेची बाब आहे. या भागातील वाढता तणाव त्वरित थांबवला पाहिजे. शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी मुत्सद्दी चर्चांच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे." भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की, आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे तंतोतंत पालन केले जावे. सागरी जलमार्गांवरून होणारा व्यापार आणि जहाजांची वाहतूक विनाअडथळा व सुरक्षितपणे सुरू राहण्यासाठी त्वरित ठोस पावले उचलली जावीत.

अमेरिका-इराण संघर्ष आणि जहाजांवरील धोके

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि हॉर्मूझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी वाहतूक धोक्यात आली आहे. भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर थेट हल्ला होण्याची ही दुर्मिळ घटना मानली जाते, परंतु या संघर्षाचा फटका थेट भारतीय खलाशांना बसत आहे. याआधीही मे महिन्यात ओमानच्या समुद्रात एक भारतीय मालकीचे जहाज अशाच अज्ञात हल्ल्यात बुडाले होते.

भारतीय खलाशांवर अलीकडे झालेले प्रमुख हल्ले

३० ऑक्टोबर : हॉर्मूझच्या सामुद्रधुनीत २७ भारतीय खलाशी असलेल्या पनामाच्या तेल टँकरवर लिंपेट माईन्सद्वारे (Limpet Mines) हल्ला करण्यात आला, ज्यामुळे इंजिन रूममध्ये आग लागली होती.

११ ऑक्टोबर (पहिली घटना) : निकारागुआ देशाचा टँकर 'एमटी पेट्रो डॉल्फिन' यावर ओमानच्या सोहार किनाऱ्याजवळ ड्रोन हल्ला झाला. या घटनेनंतर २ भारतीय खलाशी बेपत्ता झाले.

११ ऑक्टोबर (दुसरी घटना) : हॉर्मूझच्या सामुद्रधुनीतच Marshall Islands चा ध्वज असलेल्या 'एमटी वाल्थेरा' जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला झाला, ज्यावर ११ भारतीय कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >