
मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध कायम असताना इराणने भारतासह 4 देशांच्या व्यापारी जहाजांना मोठा दिलासा दिला आहे. भारत, चीन, इराक आणि कतार या देशांच्या जहाजांना सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी निर्बंधांतून सूट देण्यात आल्याची माहिती इराणच्या संसदीय समितीतील वरिष्ठ नेते अमीर हयात-मोगद्दम यांनी दिली. या निर्णयामुळे भारताच्या ऊर्जा आणि व्यापारविषयक हितसंबंधांना महत्त्व मिळाले आहे.
भारतासाठी औषध आयातीचा मार्ग सुकर?
इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे उपाध्यक्ष अमीर हयात-मोगद्दम यांनी इराणी वृत्तसंस्था ISNA ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या जहाजांना होर्मुझमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यामागे इराणला भारतातून औषधांची आयात सुलभ करणे हा उद्देश आहे. चीनच्या जहाजांना सूट देण्यामागे बीजिंगचा राजकीय पाठिंबा मिळवण्याचा हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय आणि चिनी जहाजांकडून इराण पारगमन शुल्क आकारत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कतारच्या जहाजांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. इराकच्या जहाजांकडून शुल्क आकारले जाते की नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स हे पक्ष आमनेसामने आले होते. खरं तर या ...
भारताच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी होर्मुझ महत्त्वाची
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 90 टक्के तेल आयात करतो. त्यातील सुमारे 30 टक्के आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. याशिवाय भारताच्या LPG आयातीपैकी जवळपास 90 टक्के आणि कतार व संयुक्त अरब अमिरातीमधून येणाऱ्या LNG आयातीपैकी 50 टक्क्यांहून अधिक पुरवठा या जलमार्गातून होतो. भारताने रशिया, अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह येथून ऊर्जा आयात वाढवून होर्मुझवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही हा जलमार्ग भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे.
जागतिक तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग
इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पश्चिम आशियातून होणाऱ्या जागतिक समुद्री तेल पुरवठ्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. या सामुद्रधुनीतील निर्बंधांमुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ आणि व्यापारी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील मुक्त आणि सुरक्षित वाहतुकीची मागणी वारंवार केली आहे. इराणच्या या निर्णयामुळे भारतीय जहाजांच्या वाहतुकीला दिलासा मिळू शकतो. मात्र, निर्बंधांमधून मिळालेली सूट प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते आणि जहाजांची सुरक्षित वाहतूक किती सुरळीत होते, याकडे लक्ष लागले आहे.





