Sunday, September 20, 2026

Sports minister India : क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून जपानमध्ये 'संडेज ऑन सायकल'चे नेतृत्व; आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा वाढवला उत्साह!

Sports minister India : क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून जपानमध्ये 'संडेज ऑन सायकल'चे नेतृत्व; आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा वाढवला उत्साह!

नागोया (जपान) : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जपानमधील नागोया येथील मेईजो पार्क येथे 'संडेज ऑन सायकल'च्या ९१ व्या आवृत्तीचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जपानमधील भारतीय समुदायाला एकाच मंचावर एकत्र आणले.(Sports minister India)

आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश

क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय समुदायाशी असलेले परस्परसंबंध अधिक दृढ करणे आणि 'फिट इंडिया' मोहिमेअंतर्गत आरोग्यदायी जीवनशैली व तंदुरुस्तीचा संदेश जगभरात पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. 'संडेज ऑन सायकल'च्या या विशेष आवृत्तीत सहभागी झालेल्या नागरिकांशी डॉ. मांडविया यांनी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांच्या अफाट उत्साहाचे कौतुक केले.

५०० हून अधिक भारतीय खेळाडूंचा सहभाग

या वेळी बोलताना डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, "जपानमधील नागोया येथे आशियाई खेळांना दिमाखात सुरुवात झाली असून, भारताचे ५०० हून अधिक तरुण खेळाडूंचे मोठे पथक या स्पर्धेत सहभागी झाले आहे." भारतीय समुदायाने या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवले असल्याचे सांगत त्यांनी परदेशातही भारतीयांनी दाखवलेल्या देशप्रेमाची प्रशंसा केली. आपले खेळाडू स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत असून, स्थानिक भारतीय नागरिकांचा पाठिंबा त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.(Sports minister India)

विविध संस्थांचे सहकार्य

'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' हा लोकप्रिय उपक्रम केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (MYAS), सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI), राहगिरी फाउंडेशन आणि 'माय भारत' (MY Bharat) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो.(Sports minister Mansukh Mandaviya)

डॉ. मांडविया सध्या आशियाई खेळ २०२६ च्या निमित्ताने जपानच्या दौऱ्यावर असून, ते सातत्याने भारतीय खेळाडू, अधिकारी आणि तेथील अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधत आहेत. यातून जागतिक स्तरावर भारताची क्रीडा संस्कृती बळकट करण्याची आणि एक निरोगी भारत घडवण्याची सरकारची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >