IND vs BAN: भारतीय संघ जानेवारी महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार? दोन वर्षांचा गुंता सुटला का?
भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. यापूर्वी दोन वेळा भारताचा बांगलादेश दौरा टळला आहे. आता जानेवारी महिन्यात भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार असं बोललं जात आहे.
November 6, 2026 01:14 PM
IND vs BAN: भारतीय संघ जानेवारी महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार? दोन वर्षांचा गुंता सुटला का? (Photo: ANI)
बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षात राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती आहे. दरम्यानच्या काळात राजकीय उलथापालथीमुळे बरंच काही घडलं. असं असताना बीसीसीआयने भारतीय संघाला बांगलादेशला पाठवणं दोनदा टाळलं. यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं होतं. मात्र असं असूनही भारताचा दौरा काही झाला नाही. आता भारतीय संघ जानेवारी 2027 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाईल असं सांगण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात सहा सामन्यांची व्हाईट बॉल क्रिकेट मालिका होईल, असं बोललं जात आहे. यासाठी संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. पण या आरखड्याबाबत बीसीसीआय किंवा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याबाबत काहीही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे हा दौरा होईल की नाही हा देखील संभ्रम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बोर्ड या दौऱ्यासाठी सकारात्मक आहेत.
.. जर दौरा झाला, तर मालिका कशा होणार?
भारताच्या प्रस्तावित दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका होईल असं सांगण्यात येत आहे. 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान झिम्बाब्वेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरू होईल. त्यामुळे अशा स्थितीत या दौऱ्याचं वेळापत्रक बसवणं कठीण आहे. दुसरीकडे, भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षात ताणले गेले आहेत. त्यामुळे भारत सरकार याबाबत काय निर्णय घेते? याकडे लक्ष असेल. बीसीसीआयदेखील या प्रस्ताविक दौऱ्याला शेवटचं स्वरूप देण्यासाठी सरकारच्या मंजुरीची वाट पाहात आहे.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी ...
यापूर्वी भारतीय संघ जुलै महिन्यात बांगलादेश जाणार असं ठरलं होतं. पण हा दौरा स्थगित करण्यात आला होता. तसेच बांगलादेशचा संघ टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात आला नव्हता. त्यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांमधील संबंध ताणले गेले होते. पण बांगलादेशमधील राजकीय स्थिती बदल्यानंतर दोन्ही देशात क्रिकेटची मालिका होईल, असं दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने विजय मिळवला आणि देशात नेतृत्व बदल केला. आता दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डांमध्ये संबंध सुधारण्याची शक्यता वाढली आहे.