Sunday, September 20, 2026

BMC Ganeshotsav initiative : श्रीगणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा, आठवणी आणि वारसा डिजिटल स्वरुपात जतन करणार; ‘Bappa.org’ उपक्रमात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन

BMC Ganeshotsav initiative : श्रीगणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा, आठवणी आणि वारसा डिजिटल स्वरुपात जतन करणार; ‘Bappa.org’ उपक्रमात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील श्रीगणेशोत्सवाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, धार्मिक प्रथा, कौटुंबिक आठवणी, कलात्मक सजावट आणि समाजोपयोगी उपक्रम यांचे डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘Bappa.org’ हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मुंबईतील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे तसेच मंदिर न्यासांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.(BMC Ganeshotsav initiative)

श्रीगणेशोत्सवाच्या हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचा अविभाज्य भाग आहे. मुंबई शहर, उपनगरातील विविध भागांमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जोपासल्या जात आहेत. प्रत्येक कुटुंबाची, गृहनिर्माण संस्थेची आणि सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाची श्रीगणेशोत्सव साजरा करण्याची स्वतंत्र पद्धत, परंपरा आणि आठवणी असतात. या वैविध्यपूर्ण परंपरांचे डिजिटल माध्यमातून संकलन करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(BMC Ganeshotsav initiative)

या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाशी संबंधित श्रीगणेशमूर्ती, सजावट, पारंपरिक प्रथा, आरत्या, कुटुंबीयांच्या आठवणी, उत्सवातील अनुभव, पारंपरिक पाककृती, ऐतिहासिक संदर्भ, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक कार्य यांची माहिती नोंदविता येणार आहे. यासाठी नागरिकांनी ‘Bappa.org’ या संकेतस्थळावर श्रीगणेशमूर्ती अथवा सजावटीचे छायाचित्र अपलोड करून त्यासोबत आपल्या परंपरेविषयी, देखाव्याविषयी किंवा सामाजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती नोंदवावी. छायाचित्रे, व्हिडिओ आणि श्रीगणेशोत्सवाशी संबंधित विविध अनुभव डिजिटल माध्यमातून नोंदविण्याची सुविधा या उपक्रमात उपलब्ध करून देण्यात आली आहे.(BMC Ganeshotsav initiative)

मुंबईतील श्रीगणेशोत्सवामध्ये पारंपरिक आरत्या, कौटुंबिक प्रथा, सार्वजनिक मंडळांचे सामाजिक उपक्रम, कलात्मक देखावे, पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती, शाडू मातीच्या मूर्ती निर्मितीचे प्रयत्न, सामाजिक संदेश देणारी सजावट तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो. अशा परंपरा आणि उपक्रमांची नोंद डिजिटल स्वरूपात झाल्यामुळे मुंबईच्या श्रीगणेशोत्सवातील सांस्कृतिक वैविध्याचे जतन होण्यास मदत होणार आहे. यासोबतच, समाजातील विविध घटकांच्या सहभागातून श्रीगणेशोत्सवाशी संबंधित अनुभव आणि आठवणी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी या उपक्रमामुळे उपलब्ध होणार आहे.(BMC Ganeshotsav initiative)

श्रीगणेशोत्सवाच्या माध्यमातून जोपासल्या जाणाऱ्या सांस्कृतिक परंपरा, पर्यावरणीय जाणीव आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करत, मुंबईकरांनी आपल्या श्रीगणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, आठवणी, परंपरा आणि उपक्रमांची माहिती ‘Bappa.org’ या डिजिटल उपक्रमावर नोंदवावी. नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यास यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे डिजिटल संवर्धन करण्यास हातभार लावावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.(BMC Ganeshotsav initiative)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >