Ahilyanagar Crime News: अहिल्यानगरच्या केडगाव परिसरात भारतीय लष्कराच्या दक्षिणी मिलिटरी इंटेलिजन्स (MI) आणि अहिल्यानगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कथित देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून, दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासात सुटका करण्यात आलेली महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
दीपनगर, केडगाव परिसरात एका महिलेने इतर महिलांना देहविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याची आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचवेळी मिलिटरी इंटेलिजन्सचं पथकही या कथित नेटवर्कवर लक्ष ठेवून होतं. मिळालेल्या माहितीच्या आधारे 19 सप्टेंबर रोजी लष्करी गुप्तचर विभाग आणि पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाईदरम्यान सईदा अफसर खान (वय 54, रा. झेंडा चौक, केडगाव) आणि छोटूराम नारायण राजी (वय 70, रा. केडगाव) यांना ताब्यात घेण्यात आलं. घटनास्थळावरून एका महिलेचीही सुटका करण्यात आली.
Nashik Crime News: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी सकाळी उभ्या असलेल्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ ...
सुटका केलेली महिला बांगलादेशी
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सुटका करण्यात आलेली महिला बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसह मोबाईल सेलचे कर्मचारी तसेच मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकाचा सहभाग होता.
बांगलादेशी कनेक्शनचा तपास
सुटका करण्यात आलेल्या महिलेची चौकशी केल्यानंतर तिचा पती मोहम्मद टुटुल मुल्ला (वय 37) याच्याबाबतही माहिती समोर आली आहे. तो मूळचा खुलना, बांगलादेश येथील रहिवासी असून सध्या अहिल्यानगरमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि देहविक्रीशी संबंधित नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास सध्या पोलिस आणि मिलिटरी इंटेलिजन्सकडून संयुक्तपणे केला जात आहे.
बेकायदेशीर स्थलांतराच्या संशयावरही तपास
मिलिटरी इंटेलिजन्सकडून आपल्या कार्यक्षेत्रात बांगलादेशी नागरिकांसह परदेशी नागरिकांच्या कथित बेकायदेशीर घुसखोरी आणि स्थलांतराच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी जून 2025 मध्येही एमआयडीसी अहिल्यानगर परिसरात मिलिटरी इंटेलिजन्सने अशाच प्रकारची कारवाई केली होती. सध्याच्या प्रकरणात देहविक्री रॅकेट आणि बेकायदेशीर स्थलांतरामागे आणखी कोणाचं नेटवर्क आहे का, याचा तपास सुरू आहे.