Monday, September 21, 2026

Nashik News : समृद्धी, एक्स्प्रेसवेवर 24 तास वाॅच ! महामार्ग सुरक्षेसाठी मोठा निर्णय; 1,101 कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ

Nashik News : समृद्धी, एक्स्प्रेसवेवर 24 तास वाॅच ! महामार्ग सुरक्षेसाठी मोठा निर्णय; 1,101 कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ

Nashik News : राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्ग सुरक्षा पथकातील 1,101 कर्मचाऱ्यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 25 हून अधिक जिल्ह्यांमध्ये महामार्ग सुरक्षा यंत्रणा सक्रिय राहणार आहे.

अतिवेग आणि लेन कटिंगवर पोलिसांची नजर

महामार्गांवरील अपघातांमध्ये अतिवेग, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे आणि लेन कटिंग यांसारख्या कारणांचा मोठा वाटा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे महामार्ग सुरक्षा पथकाकडून स्पीड गन आणि आधुनिक ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणांच्या माध्यमातून वाहनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या 1,101 कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई, चालक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे महामार्गांवर नियमित गस्त सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.

अपघात झाल्यास तातडीने मदत

नाशिक-पुणे, मुंबई-नाशिक, नाशिक-गुजरात आणि दिव-दमन मार्गांसह खंडाळा, बोरघाट आणि इतर धोकादायक भागांमध्ये विशेष लक्ष दिलं जाणार आहे. बोरघाट आणि चिंचोटी परिसरातील क्रेन चालक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही या व्यवस्थेत समावेश आहे. महामार्गावर अपघात झाल्यास किंवा एखादं वाहन नादुरुस्त झाल्यास रस्ता मोकळा करण्यासाठी तसेच जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी या पथकाचा उपयोग होणार आहे.

सणासुदीच्या काळात वाढणार वाहतुकीचा भार

ही मुदतवाढ 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीसाठी आहे. या सहा महिन्यांत गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि वर्षअखेरीच्या सुट्ट्यांमुळे महामार्गांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा काळात वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांच्या बिघाडामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी हाताळण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

नाशिकसह 'या' जिल्ह्यांना मिळणार लाभ

या निर्णयाचा नाशिक ग्रामीण, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, रायगड, अमरावती आणि नांदेड या जिल्ह्यांतील महामार्ग सुरक्षा केंद्रांना लाभ मिळणार आहे.

जिल्हानिहाय पदसंख्या :

- नाशिक ग्रामीण – 109

- पुणे ग्रामीण – 115

- ठाणे ग्रामीण – 171

- अहमदनगर – 51

- जळगाव – 36

- धुळे – 22

- छत्रपती संभाजीनगर – 41

- रायगड – 34

- अमरावती – 42

- नांदेड – 36

कोणत्या पदांना मुदतवाढ ?

एकूण 1,101 पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये अपर पोलीस महासंचालक (1), पोलीस अधीक्षक (3), पोलीस उपअधीक्षक (3) यांच्यासह पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई, चालक आणि तांत्रिक मदतनीस या पदांचा समावेश आहे. या निर्णयामुळे आगामी सहा महिन्यांत राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांवरील गस्त, वाहतूक नियंत्रण, अपघात व्यवस्थापन आणि आपत्कालीन मदत व्यवस्था सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >