Chandrashekhar Bawankule News: महसुलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे केंद्रीय सचिवांकडून कौतुक
September 21, 2026 07:22 PM
मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या उपयोगितेची दखल केंद्र सरकारने घेतली असून, पुणे येथे सुरू झालेले मॉडेल नोंदणी कार्यालय आता देशभर प्रारंभ करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने दिले आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी अशी कार्यालये देशभर सुरू करण्यासाठी प्रत्येक कार्यालयासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले.
केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित 'केंद्रीय नोंदणी विधेयक, २०२६' संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे व उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे उपस्थित होते. या बैठकीत प्रस्तावित विधेयकातील तरतुदी, संभाव्य परिणाम आणि राज्यस्तरावरील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करून राज्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या.
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन मटका आणि जुगाराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याबाबत गृह ...
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाने महसूलवाढीसोबतच नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यावर, सर्व राज्यांनी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या 'एक जिल्हा, एक नोंदणी', 'ई-प्रमाण', पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर उभारलेली 'आदर्श कार्यालये' आणि 'ई-नोंदणी' यांसारख्या गतिमान उपक्रमांचे केंद्रीय सचिवांनी विशेष कौतुक केले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेला गती देत, नागरिकांच्या सोयीसाठी भविष्यातही अधिक लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पुणे येथे सुरू झालेल्या मॉडेल कार्यालयाची दखल केंद्राने घेतली. यातूनच या कार्यालयाची उपयोगात लक्षात येते," अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.