Monday, September 21, 2026

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली 'हनुमान अंश' चित्रपटाच्या टीमची भेट! दिल्या खास शुभेच्छा

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली 'हनुमान अंश' चित्रपटाच्या टीमची भेट! दिल्या खास शुभेच्छा

नीम करौली बाबा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राजधानी नवी दिल्ली येथे प्रसिद्ध संत नीम करौली बाबा (Sant Neem Karoli Baba) यांच्या जीवनकार्यावर आधारित 'हनुमान अंश' (Hanuman Ansh) या आगामी चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांची विशेष भेट घेतली. सोमवारी (२१ सप्टेंबर) पार पडलेल्या या बैठकीत अमित शाह यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमशी मनमोकळा संवाद साधला आणि या अध्यात्मिक विषयावर चित्रपट बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

नीम करौली बाबा हे भारतातील अत्यंत आदराचे आणि दैवी स्थान असलेले संत मानले जातात. भाविक त्यांना भगवान श्री हनुमानाचा अवतार मानतात. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही त्यांचा मोठा भक्तवर्ग आहे. 'ॲपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि 'फेसबुक'चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांसारख्या जगातील अनेक नामवंत व्यक्तींनी बाबांच्या कैंची धाम आश्रमाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. बाबांच्या याच अद्भुत आणि अध्यात्मिक जीवनप्रवासावर 'हनुमान अंश' या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या भेटीदरम्यान कलाकारांनी चित्रपटाच्या कथानकाची आणि निर्मितीची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांना दिली.

गृहमंत्री अमित शाह यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा हा महान वारसा चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत आणि जगासमोर पोहोचवणे हे कौतुकास्पद पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. अमित शाह आणि कलाकारांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात असून, नीम करौली बाबा यांच्या भक्तांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >