Tuesday, September 22, 2026

Ganpati Decoration Safety : सजावट आणि रोषणाई आकर्षक असली तरी भाविकांचा जीव महत्वाचा

Ganpati Decoration Safety : सजावट आणि रोषणाई आकर्षक असली तरी भाविकांचा जीव महत्वाचा

विद्युत सुरक्षेबाबत सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काळाचौकी येथे गणेशोत्सवाच्या परिसरात विजेचा धक्का लागून दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही भाविक जखमी झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गणेशोत्सव विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि गणेश दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी. त्यामुळे कोणत्याही विद्युत सुरक्षेबाबत मंडळांनी कोणतीही तडजोड करू नये असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना केले आहे.

गणेश मंडळांची सजावट आणि रोषणाई कितीही आकर्षक असली तरी त्यापेक्षा भाविकांचा जीव अधिक मौल्यवान आहे. भक्तीमध्ये शक्ती आहे, पण सुरक्षिततेमध्ये जबाबदारी आहे. गणरायाची सेवा म्हणजे प्रत्येक भाविकाची सुरक्षितता जपणे. सर्व गणेश मंडळांनी वरील सर्व अनिवार्य विद्युत सुरक्षा बाबींची पूर्तता केली जाईल याची तातडीने खात्री करावी,अशीही विनंती केली आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व मंडळांना आवाहन करताना सूचना केल्या आहेत. पावसाळ्यात किंवा ओलसर वातावरणात विद्युत सुरक्षेचे महत्त्व आणखी वाढते. त्यामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्पुरत्या विद्युत जोडण्या, स्टॉल, प्रकाशयोजना किंवा उघड्या तारांची व्यवस्था राहणार नाही, याची प्रत्येक मंडळाने विशेष दक्षता घ्यावी. मंडपातील विद्युत व्यवस्था सुरक्षित आहे की नाही, याची आजच पुन्हा तपासणी करून घ्या. एखादी त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त होईपर्यंत संबंधित विद्युत जोडणी वापरू नये. एक छोटीशी विद्युत चूक एखा‌द्या निष्पाप भाविकाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे "नंतर पाहू" अशी भूमिका न घेता "आताच तपासू आणि सुरक्षित करू" हा दृष्टिकोन प्रत्येक मंडळाने स्वीकारावा.

सर्व मंडळांना आवाहन करताना त्यांनी सूचना करताना असेही म्हटले आहे की, बेस्ट प्रशासनाने तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून दिलेल्या विद्युत सुरक्षा सूचनांचे तातडीने पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये संपूर्ण विद्युत यंत्रणेचा कनेक्टेड लोड मंजूर भाराच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावा. तसेच मुख्य तारा/केबल्स, स्विचेस, एमसीबीएस इएलसीबीजी इत्यादींची क्षमता कनेक्टेड लोडमध्ये असावी.

प्रत्येक विद्युत उपकरणासाठी योग्य व स्वतंत्र आर्थिंग व्यवस्था असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्युत जोडणीसाठी ईएलसीबी बसविणे अनिवार्य असून त्याची कार्यक्षमता तपासून घ्यावी. सर्व मुख्य विद्युत तारा पीव्हीसी इन्सुलेशन असलेल्या असाव्यात आणि त्या योग्य पीव्हीसी कंन्डंसमधून सुरक्षितपणे नेण्यात याव्यात.

याशिवाय मुख्य तारांमध्ये शक्यतो कोणतेही जोड देऊ नयेत. जोड देणे अपरिहार्य असल्यास योग्य कनेक्टर सहित जंक्शन बॉक्सचा वापर करावा. प्रत्येक विद्युत जोडणीचा इन्सुलेशन रजिस्टंस् योग्य आयआर टेस्टरद्वारे तपासावा. विद्युत यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घ्यावी आणि मागणी केल्यास त्याचा तपासणी अहवाल उपलब्ध करून द्यावा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा