iPhone 18 Pro Theft : नुकताच खरेदी केलेला iPhone 18 Pro हातात घेताच तो चोरीला गेल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, फोन हिसकावण्यापूर्वी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेकडे फोनच्या मॉडेलची चौकशी केली आणि तो नवीन iPhone असल्याची खात्री करून घेतल्यानंतर फोन घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आधी पत्ता विचारला, मग...
शुभी भंडारी या कामानिमित्त ई-रिक्षातून प्रवास करत होत्या. ई-रिक्षाचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी त्यांनी आपला नवा फोन बाहेर काढला. त्याचवेळी हेल्मेट घातलेले दोन पुरुष दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले. दोघांनी सुरुवातीला शुभी यांना पत्ता विचारला. त्यानंतर त्यांच्या हातातील फोनकडे लक्ष गेले आणि हा नवीन iPhone आहे का, अशी विचारणा केल्याचे समोर आले आहे. शुभी यांनी होकार दिल्यानंतर त्यातील एकाने फोन हातात घेतला आणि दोघेही दुचाकीवरून पसार झाले. शुभी यांच्या पती साकेत गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, हा फोन घटनेच्या अवघ्या तीन दिवस आधी खरेदी करण्यात आला होता. या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Crime News : उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात ३५ वर्षीय ‘जिल्हा केसरी’ पैलवानाची भररस्त्यात हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक ...
पोलिसांकडून CCTV फुटेजची तपासणी
या घटनेप्रकरणी बिसरख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून, आरोपींची ओळख पटवण्यासाठी इतर पुरावेही गोळा केले जात आहेत. शुभी यांच्या कुटुंबीयांनी सकाळच्या वेळी मुख्य रस्त्यांवर पोलिसांची उपस्थिती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
iPhone 18 Pro ची किंमत किती?
Appleच्या अधिकृत माहितीनुसार भारतात iPhone 18 Pro ची सुरुवातीची किंमत ₹1,64,900 आहे. 256GB पासून 2TB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. फोनमध्ये 48MP Fusion Main कॅमेरा देण्यात आला आहे. दरम्यान, अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेला महागडा फोन अशा पद्धतीने चोरीला गेल्याने या घटनेची चर्चा होत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.