कर्करोगविरोधी औषधांच्या किमतीत मोठी कपात! 9 नोव्हेंबरपासून नवे दर लागू; रुग्णांची वर्षाला ₹3,502 कोटींची बचत

केंद्र सरकारच्या NPPA ने 137 कर्करोगविरोधी औषधांवरील ट्रेड मार्जिनची मर्यादा निश्चित केली आहे. 9 नोव्हेंबर 2026 पासून सुधारित दर लागू होणार असून, 1,031 औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत. या निर्णयामुळे रुग्णांची दरवर्षी 3,502.31 कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली : कर्करोगाच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) घेतला आहे. 137 कर्करोगविरोधी औषधांवरील ट्रेड मार्जिनची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, सुधारित दर 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे विविध ब्रँड्सच्या 1,000 हून अधिक औषधांच्या किमती कमी होणार असून, ग्राहकांची दरवर्षी 3,502.31 कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे.



1,031 औषधांच्या किमतीत कपात


रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध निर्माण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या NPPA ने कर्करोगविरोधी औषधांच्या कमाल किरकोळ विक्री दरांवरील ट्रेड मार्जिनची मर्यादा निश्चित केली आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे 17 ऑक्टोबर 2026 रोजी हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत 76 औषध कंपन्यांनी 121 औषधांचा समावेश असलेल्या 1,225 कर्करोगविरोधी औषध फॉर्म्युलेशन्सचे सुधारित कमाल किरकोळ विक्री दर जाहीर केले आहेत. यापैकी 1,031 औषध फॉर्म्युलेशन्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 600 ब्रँड्सच्या औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक कपात झाली आहे. सर्वाधिक कपातीचे प्रमाण 96.45 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.



वर्षाला 3,502 कोटी रुपयांची बचत


कर्करोगाच्या उपचारांचा खर्च अनेक रुग्णांसाठी मोठे आर्थिक आव्हान ठरतो. औषधांच्या किमती कमी झाल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची दरवर्षी सुमारे 3,502.31 कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. निश्चित करण्यात आलेल्या 137 कर्करोगविरोधी औषधांपैकी 10 ते 15 औषधे अद्याप भारतीय बाजारात उपलब्ध नाहीत. मात्र, ही औषधे बाजारात दाखल झाल्यानंतर त्यांनाही ट्रेड मार्जिन नियंत्रणाचे नियम लागू होणार आहेत.



औषधांवर 30 टक्के ट्रेड मार्जिनची मर्यादा


17 ऑक्टोबर 2026 रोजी जारी करण्यात आलेली अधिसूचना SO 5690 (E) पुढील आदेशांपर्यंत लागू राहणार आहे. औषधे (किंमत नियंत्रण) आदेश, 2013 मधील तरतुदींनुसार उत्पादकांना वार्षिक किंमतवाढ करता येणार असली, तरी निर्धारित 30 टक्के ट्रेड मार्जिनच्या मर्यादेचे पालन करणे बंधनकारक असेल. कर्करोगविरोधी औषधांची उपलब्धता वाढवणे आणि ती रुग्णांना परवडणाऱ्या दरात मिळावीत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.



औषधांच्या सुधारित दरांची यादी प्रदर्शित करणे बंधनकारक


औषधांचे किरकोळ विक्रेते, पुरवठादार, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना कर्करोगविरोधी औषधांच्या सुधारित दरांची यादी आपल्या संकेतस्थळावर तसेच आवारात ठळकपणे प्रदर्शित करावी लागणार आहे. राज्य औषध नियंत्रकांच्या माध्यमातून उत्पादक, पुरवठादार, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवली जाणार आहे.



Pharma Sahi Daam ॲपवर तपासता येणार दर


रुग्ण आणि ग्राहकांना कर्करोगविरोधी औषधांचे लागू असलेले दर तपासण्यासाठी Pharma Sahi Daam मोबाईल ॲपचा वापर करता येणार आहे. तसेच NPPA च्या अधिकृत संकेतस्थळावरही औषधांच्या किमती उपलब्ध असतील. सुधारित दरांचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना NPPA कडे तक्रार नोंदवता येणार आहे.


तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क :




  • ई-मेल: monitoring-nppa@gov.in

  • हेल्पलाइन: 1800-11-1255

  • संकेतस्थळ: www.nppa.gov.in


  • टपालाचा पत्ता: उपसंचालक, संनियंत्रण (Monitoring), राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA), तिसरा मजला, YMCA सांस्कृतिक केंद्र इमारत, 1 जयसिंग मार्ग, नवी दिल्ली – 110001.



Comments
Add Comment

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी; बागडोगरा हवाई दल स्थानकावर सैनिकांना मिठाई वाटप

सिलिगुडी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी बागडोगरा हवाई दल स्थानकाला भेट देत भारतीय हवाई दलाच्या

'अयोध्येत या, पण आधी माफी मागा', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अखिलेश सिंह यादव यांच्यावर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. समाजवादी पार्टी नेते अखिलेश

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा; ‘दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नाही, तर अंधारावर मात करणारा संकल्प!’

नवी दिल्ली : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आणि जगभरातील भारतीयांना

भारतीय हवाई दलाने रचला इतिहास! IL-76MD विमानाने केले लडाखमधील न्योमा येथे जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक उंचीवरील लँडिंग

भारतीय हवाई दलाने अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. IAF ने पुन्हा एकदा आपली क्षमता जगाला दाखवून दिली आहे. IL-76MD या

35 हजार स्वयंसेवक प्रज्वलित करणार 30 लाख दिवे, अयोध्या नगरीत प्रस्थापित होणार 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या: प्रभू श्रीरामाची पावन भूमी असलेल्या रामनगरी अयोध्येमध्ये यंदाचा दहावा दीपोत्सव आजवरचा सर्वाधिक भव्य

BMW Gift to Son: मुलाला नववीत चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आलिशान कार; किमंत ऐकून व्हाल चकित

BMW Gift to Son: मुंबईत एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमन म्हणून काम करणाऱ्या एका तांदूळ व्यापाऱ्याने आपल्या निववीत