Nashik Kumbh 2027 Health Plan : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे. केवळ मोठ्या रुग्णालयांवर अवलंबून न राहता भाविक ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने असतील, त्याच परिसरात प्राथमिक आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साधुग्राम, घाट, पार्किंग, होल्डिंग आणि स्टेजिंग एरिया तसेच प्रमुख मार्गांवर मिळून १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात येणार आहेत. पर्वणीच्या काळात १९० रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येतील, तर आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी ३,६०० अतिरिक्त वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाणार आहे.
२६० कोटींच्या आरोग्य आराखड्याला मंजुरी
सिंहस्थाच्या आरोग्यविषयक तयारीसाठी महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि प्रादेशिक संदर्भ रुग्णालय यांच्या आरोग्यविषयक आराखड्यांना २६० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यात तात्पुरती रुग्णालये व दवाखाने, रुग्णवाहिका, अतिरिक्त मनुष्यबळ, आयसीयू क्षमता, औषधे, वैद्यकीय उपकरणे, रोगनियंत्रण तसेच डिजिटल आरोग्य निरीक्षणाचा समावेश आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, भाविकांना त्यांच्या जवळच वैद्यकीय सेवा मिळावी आणि गरज भासल्यास रुग्णांना कमीत कमी वेळेत पुढील उपचारासाठी हलविता यावे, यासाठी विविध आरोग्य यंत्रणांच्या क्षमतांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे.
गर्दीच्या ठिकाणी १३६ तात्पुरती आरोग्य केंद्रे
सिंहस्थादरम्यान साधुग्राम, पार्किंग परिसर, घाट, होल्डिंग व स्टेजिंग एरिया, बाह्य पार्किंग आणि प्रमुख मार्गांजवळ १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये तात्पुरती रुग्णालये, आयसीयू आणि दवाखान्यांचा समावेश असेल. या सुविधा पोर्टा-कॅबिन स्वरूपात उभारण्यात येणार असून, किरकोळ आजार, दुखापत किंवा प्राथमिक उपचारांची गरज असलेल्या भाविकांना तातडीने उपचार मिळतील.
पर्वणीच्या काळात १९० रुग्णवाहिका
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना पुढील उपचार केंद्रापर्यंत वेगाने पोहोचवण्यासाठी १९० रुग्णवाहिका उपलब्ध असतील. यामध्ये ALS आणि BLS रुग्णवाहिकांचा समावेश करण्यात येणार आहे. रुग्णालये, तात्पुरती आरोग्य केंद्रे, घाट, साधुग्राम, पार्किंग, होल्डिंग व स्टेजिंग एरिया आणि प्रमुख मार्गांवर या रुग्णवाहिका तैनात राहतील. खरेदी केलेल्या तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांचा यात समावेश असेल. खरेदी केलेल्या रुग्णवाहिका सिंहस्थ संपल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी वापरण्यात येणार आहेत.
३,६०० अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी
वाढलेल्या आरोग्य सुविधांसाठी ३,६०० अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टर, परिचारिका, एएनएम, औषधनिर्माते, वैद्यकीय तंत्रज्ञ तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. सिंहस्थापूर्वी या कर्मचाऱ्यांना मोठ्या गर्दीतील रुग्ण व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Nashik Dr Manisha Jejurkar Death Case : गंगापूर रोडवरील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्या बहीण ...
१,९४५ खाटांची उपचार क्षमता
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन उपचार क्षमताही वाढविण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध १,३०५ खाटांमध्ये आणखी ६४० खाटांची भर पडणार आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या काळात एकूण १,९४५ खाटांची क्षमता उपलब्ध होईल.यामध्ये १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल. त्यामुळे नियमित रुग्णसेवेसोबत सिंहस्थादरम्यान वाढणारा रुग्णभार हाताळण्यासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि आरोग्यशाळा रुग्णालय या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये ७३ अतिरिक्त आयसीयू खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत.यामुळे या रुग्णालयांची एकत्रित आयसीयू क्षमता १७ वरून ९० खाटांपर्यंत, तर एकूण खाटांची क्षमता ३५० वरून ५५० होणार आहे.
डिजिटल पद्धतीने आजारांवर नजर
सिंहस्थादरम्यान विविध भागांमध्ये आढळणाऱ्या आजारांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करून त्याचे रोगनिहाय निरीक्षण केले जाणार आहे. एखाद्या परिसरात विशिष्ट आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा वेळेत मागोवा घेण्यास या यंत्रणेची मदत होईल. तसेच रुग्णवाहिकांच्या हालचालींसाठी GPS ट्रॅकिंग, आरोग्य केंद्रांमधील डिजिटल नोंदणी आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्थेचाही आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
तीन पोर्टेबल मेडिकल युनिट्सही सज्ज
सिंहस्थाच्या काळात गरजेनुसार विविध ठिकाणी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता यावी, यासाठी तीन पोर्टेबल आपत्कालीन वैद्यकीय युनिट्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. आवश्यकतेनुसार ही युनिट्स गर्दीच्या किंवा इतर गरजेच्या ठिकाणी तैनात करून तेथेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येणार आहे.