रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. सिग्नल, हेल्मेट यासह अनेक वाहतुकीचे नियम आहेत. गाडी चालवताना या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. नाही तर वाहतूक पोलीस तुम्ही केलेल्या चुकीसाठी दंड ठोठावतात. वाहतुकीचे नियम पाळले नाही तर अपघाताचं प्रमाण वाढत जाईल. त्यासाठी या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं जातं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? समुद्रात जहाजे वाहतूक करतात तेव्हा नियम कसे पाळतात? तिथे काही वाहतुकीचे नियम असतात का? तर या प्रश्नांचं उत्तर 'हो' असं आहे. समुद्रातही जहाजांची वाहतूक करण्यासाठी नियमावली आहे. हे नियम पाळणं जगभरातील देशांना बंधनकारक आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विविध देशातील विविध संस्थांकडे असते.
काय आहेत जल वाहतुकीचे नियम?
समुद्रात जहाजांची वाहतूक होत असताना कोणतेही ट्राफिक लाइट, लेन मार्किंग आणि स्टॉप साइन नसते. यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने 'कोलरेग्स' नावाचा नियमावलीचा संच तयार केला आहे. या नियमांची अमलबजावणी 1977 पासून केली जात आहे. यात एकूण 41 नियम आहे. दोन जहाजे एकमेकांसमोर उभी ठाकली तर कोणी मार्ग द्यावा इथपासून कोणत्या लाईट आणि सिग्नल दाखवावे, जहाजांची धडक होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी? असे अनेक नियम आहेत. दोन जहाजं समोरासमोर उभी ठाकली तर कोलरेग्समधील नियम 14 लागू होतो. यानुसार दोन्ही जहाजांना आपली दिशा उजवीकडे बदलणं बंधनकारक आहे. उजवीकडे वळल्यामुळे जागा तयार होते आणि दोन्ही जहाजे एकमेकांच्या डाव्या बाजूने सुरक्षितपणे पुढे निघून जातील.
बुरखा आणि नकाबवर या देशात पूर्णपणे बंदी, मुस्लिमबहुल देशातही चेहरा झाकण्यावर निर्बंध, जाणून घ्या सविस्तर
इटलीत बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी संसदेच्या पटलावर एक विधेयक मांडलं जाणार आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ...
किनारपट्टीजवळ दंड ठोठवण्याचा अधिकार कोणाला?
जहाज एखाद्या देशाच्या सागरी हद्दीत असते तेव्हा त्या जहाजावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार हा त्या देशाच्या तटरक्षक दलावर असतो. भारतात ही जबाबदारी भारतीय तटरक्षक दलावर आहे. या दलाची स्थापना 1978 च्या तटरक्षक कायद्यांतर्गत झाली आहे. या कायद्यानुसार भारतीय तटरक्षक दल अवैध मासेमारी, तस्करी आणि इतर काही नियमांचं उल्लंघन केल्यानंतर कारवाई करते. पण सागरी हद्दीच्या बाहेर असं काही घडलं तर कारवाई कोण करणार? तर अशा स्थितीत कोलरेग्स नियमांची अमलबजावणी करण्याची जबाबदारी फ्लॅग स्टेटची असते. म्हणजेच जहाजाची नोंद ज्या देशात झाली आहे त्या देशाची.. प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची प्राथमिक जबाबदारी त्या देशावर असते. इतकंच काय तर जहाज एखाद्या देशाच्या बंदरात उभं केलं तर तेथील अधिकारीही ही चौकशी करू शकतात.
नियमाचं उल्लंघन केल्यास काय?
एखाद्या जहाजाने समुद्रात वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं तर त्यावर कारवाई केली जाते. कोलरेग्स अंतर्गत फ्लॅग स्टेट किंवा तटरक्षक दलाच्या नियमानुसार कारवाई होते. यात जहाजाच्या कॅप्टनला दंड, परवाना निलंबन आणि नुकसान भरपाईची कारवाई होऊ शकते. जर प्रकरण खूपच गंभीर असेल तर दोन देशातील राजनैतिक हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवू शकतात.