Thursday, September 24, 2026

दिशा सालियन प्रकरणातील पुरावे सीबीआयकडे सुपूर्द, वडील सतीश सालियन यांच्याकडून पेन ड्राइव्ह जमा; दोषींवर तातडीने कारवाईची मागणी

दिशा सालियन प्रकरणातील पुरावे सीबीआयकडे सुपूर्द, वडील सतीश सालियन यांच्याकडून पेन ड्राइव्ह जमा; दोषींवर तातडीने कारवाईची मागणी

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित पुरावे असलेला पेन ड्राइव्ह त्यांचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील अॅड. निलेश ओझा यांनी गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सुपूर्द केला. या पेन ड्राइव्हमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग, साक्षीदारांचे जबाब, छायाचित्रे, दूरध्वनी संभाषणे तसेच अन्य डिजिटल पुरावे असल्याचा दावा ओझा यांनी केला. या प्रकरणात तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींविरोधात सीबीआयने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.(Disha Salian Case)

सतीश सालियन यांच्यासोबत सीबीआय कार्यालयात आलेले अॅड. ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेन ड्राइव्हमध्ये काही प्रत्यक्षदर्शींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असून, त्यातून दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या घटनाक्रमाबाबत माहिती मिळू शकते. उच्च न्यायालयाच्या आदेशात उल्लेख असलेल्या साक्षीदारांशी संबंधित पुरावेही सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा कार्यकर्ता असलेल्या नावेद या व्यक्तीच्या कथित जबाबाचाही त्यांनी उल्लेख केला. या जबाबातील काही बाबी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य नोंदींशी विसंगत असल्याचा दावा ओझा यांनी केला.

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि मोबाइल टॉवर लोकेशनसारखे डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात, असे ओझा यांनी सांगितले. १३ सप्टेंबर रोजी सतीश सालियन यांचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर तपासासाठी ६० दिवसांची मुदत असल्याचा दावा ओझा यांनी केला. या कालावधीत तपास, अटक, कोठडीची प्रक्रिया आणि आरोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तपासात आणखी आरोपींची नावे समोर आल्यास पुढील तपासाची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.(Disha Salian Case)

सतीश सालियन यांनी पेन ड्राइव्हमध्ये व्हिडीओ, छायाचित्रे, चर्चा आणि दूरध्वनी संभाषणांसह विविध प्रकारचे साहित्य असल्याचे म्हटले. या पुराव्यांमधून आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली आणि अन्य व्यक्तींचा संबंध स्पष्ट होईल, असा त्यांचा दावा आहे. पुढील सात-आठ दिवसांत सीबीआयकडून कारवाई होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(Disha Salian Case)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >