Sunday, November 8, 2026

सीमेवर जवानांसोबत संरक्षण मंत्र्यांची खास दिवाळी; राजनाथ सिंह म्हणाले, "तुमच्यामुळेच देशात उजळतात दिवे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीन सीमेवरील सिक्कीममधील शेरेथांग येथे तैनात भारतीय सैनिकांसोबत अत्यंत उत्साहात दिवाळी साजरी केली. कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणार्‍या जवानांचे कौतुक करताना, देशवासीयांच्या घरातील दिवाळी तुमच्याच बलिदानामुळे उजळत असल्याचे भावूक उद्गार त्यांनी काढले.

नाथुला (सिक्कीम): दिवाळीच्या सणानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भारत-चीन सीमेवरील सिक्कीमच्या शेरेथांग येथे भेट देत सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांसोबत वेळ घालवला. ते लष्करी हेलिकॉप्टरने शेरेथांग येथील हेलिपॅडवर उतरले आणि त्यांनी सर्वप्रथम शेरेथांग युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून राष्ट्राचे सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेसाठी प्राण पणाला लावणारे शूर सैनिक व शहीदांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी सीमावर्ती भागात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी प्रसिद्ध बाबा हरभजन सिंग मंदिराला देखील भेट देऊन नमन केले.

जवानांचे योगदान आणि शिस्तीचे महत्त्व

सैनिकांशी संवाद साधताना राजनाथ सिंह म्हणाले, "आज शेरेथांगमध्ये उभे असताना मला जाणवते की, तुमच्यापैकी प्रत्येकजण एका दिव्यासारखा आहे. तुमचा प्रकाश केवळ या चौकीपुरता मर्यादित नसून, देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे." आजच्या काळात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले, तरी सैनिकांमधील शिस्त आणि धैर्याला कोणतीही पर्याय नाही, असे सांगत त्यांनी जवानांच्या शिस्तीचे भरभरून कौतुक केले. तुमचा गणवेश, तुमची भाषा आणि कठीण प्रसंगातील संयम यामुळेच स्थानिक लोकांच्या मनात लष्कराविषयी प्रचंड आपुलकी निर्माण झाली असून, ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी जवानांवर असल्याचे त्यांनी नमूद केले.

"तुमच्यामुळेच देशवासीय शांतपणे झोपतात"

जवानांच्या त्यागाचे महत्त्व सांगताना संरक्षण मंत्री म्हणाले की, ज्याप्रमाणे दिवाळीचा दिवा शांतपणे अंधाराशी लढतो, तसेच आपले जवान सीमेवर कोणताही गाजावाजा न करता शांतपणे देशाचे रक्षण करतात. देशवासीय सण साजरे करत असताना जवान सीमेवर अत्यंत सतर्क असतात. "तुमच्यामुळेच देशातील नागरिक शांतपणे झोपतात आणि म्हणूनच दिवाळीचे दिवे अधिक तेजस्वी दिसतात," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी त्यांनी शेरेथांग सारख्या युद्ध स्मारकांच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. ही स्मारके केवळ बलिदानाची आठवण करून देत नाहीत, तर नागरिकांमध्ये राष्ट्र-अभिमानाची भावना जागृत ठेवतात, असे ते म्हणाले. कितीही पिढ्या लोटल्या तरी हे स्थळ भावी पिढ्यांना सैनिकांच्या शौर्याची प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अखेरीस, त्यांनी सर्वांना आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेल्या दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि 'भारत माता की जय' च्या जयघोषाने आपल्या भाषणाचा समारोप केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >