Thursday, September 24, 2026

Nagpur Crime : मुलांच्या किरकोळ भांडणाचा रक्तरंजित शेवट ! लोखंडी रॉडच्या हल्ल्यात 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Nagpur Crime : मुलांच्या किरकोळ भांडणाचा रक्तरंजित शेवट ! लोखंडी रॉडच्या हल्ल्यात 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Nagpur Crime News : लहान मुलांमध्ये खेळताना झालेल्या किरकोळ वादाने गंभीर रूप घेतल्याची धक्कादायक घटना नागपुरातील खरबी परिसरात घडली. मुलांच्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ३६ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी (Wathoda Police Station) पती-पत्नीसह तिघांना अटक केली आहे.मृताचे नाव शहाबाज इशाक शेख (वय ३६) असे आहे. तर वाहिद अन्सारी, इम्रान अन्सारी आणि रुबीना अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मुलांच्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेले अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, खरबी येथील मानवशक्ती लेआउट परिसरात लहान मुलांमध्ये खेळताना किरकोळ वाद आणि मारामारी झाली होती. या वादाचा जाब विचारण्यासाठी शहाबाज शेख हे आरोपींच्या घरी गेले होते. मात्र, तिथे संतापलेल्या आरोपींशी त्यांचा तीव्र वाद झाला. पाहता पाहता या वादाने अत्यंत हिंसक वळण घेतले. आरोपींनी शहाबाज यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला

वाद सुरू असताना दोन आरोपींनी शहाबाज यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शहाबाज यांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रॉमा सेंटरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच २२ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पती-पत्नीसह तिघांना अटक

घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी वाहिद अन्सारी, इम्रान अन्सारी आणि रुबीना अन्सारी यांना अटक केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास वाठोडा पोलीस (Wathoda Police Station) करत आहेत. मुलांच्या किरकोळ वादातून झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >