Thursday, September 24, 2026

Nashik Ganesh Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी, ‘या’ तारखेपर्यंत मनाई आदेश जारी

Nashik Ganesh Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी,  ‘या’ तारखेपर्यंत मनाई आदेश जारी
Nashik Rural Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 मधील कलम 163 अंतर्गत अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये 2,603 सार्वजनिक गणपती

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात यंदा सुमारे 2 हजार 603 सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाची सांगता होत असताना 25 ते 28 सप्टेंबरदरम्यान विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

लेझर लाईटमुळे डोळ्यांना धोका

लेझर लाईटच्या थेट प्रकाशामुळे नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर पूर्णपणे टाळणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सध्या या संदर्भात नाशिक ग्रामीण जिल्ह्यात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

डीजे आणि साऊंड सिस्टिमलाही सूचना

गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे आणि साऊंड सिस्टिमचे मालक तसेच चालक यांना पोलिस ठाणे स्तरावर आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणुकीत ध्वनीची मर्यादा पाळावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि विसर्जनाच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 मधील कलम 163(1) नुसार नागरिकांच्या जीविताला किंवा आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तरतूद आहे. त्याच अनुषंगाने 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईट वापरण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणेश मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >