MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी चार जणांना अटक केली आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या या कारवाईत दोन उमेदवार आणि दोन मध्यस्थांचा समावेश आहे. या नव्या अटकेनंतर प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.
सांगोला, बुलढाणा आणि नवी मुंबईतून कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार, नव्याने अटक करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये साजिद संदे याला सांगोला येथून, तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आले. याशिवाय मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली आहे. या चौघांची भूमिका आणि पेपरफुटीच्या साखळीतील त्यांचा सहभाग याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
याआधी 7 जणांना अटक
या प्रकरणाच्या तपासादरम्यान यापूर्वी MPSC चे अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, तसेच मध्यस्थ अमृत पाटील आणि लोकेश उर्फ गौरव पाटील यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय उमेदवार ऋतुजा पाटील हिलाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
सिक्कीम : सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. पश्चिम सिक्कीममधील ...
नेमकं काय आहे MPSC पेपरफुटी प्रकरण ?
MPSC कडून अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या भरतीसाठी 154 पदे होती आणि परीक्षा राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर घेण्यात आली होती. परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासात प्रश्नपत्रिकेतील प्रश्न परीक्षा होण्यापूर्वी काही व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचा आरोप समोर आला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर MPSCने औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
294 प्रश्नांच्या कथित साखळीचा तपास
गुन्हे शाखेच्या तपासात 294 प्रश्नांचा गोपनीय संच तयार करून तो परीक्षा होण्यापूर्वी अनधिकृत व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या प्रश्नसंचाचा प्रसार कसा झाला, त्यातून आणखी किती उमेदवारांना फायदा झाला आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या अटकसत्रामुळे तपासाची व्याप्ती वाढली असून, कथित पेपरफुटीमागील संपूर्ण नेटवर्क शोधण्याचे आव्हान गुन्हे शाखेसमोर आहे.






