Saturday, September 26, 2026

Siddharth Jadhav New Movie : ‘हुप्पा हुय्या’नंतर सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा दिसणार हनुमान भक्ताच्या भूमिकेत; ‘बजरंगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक चर्चेत

Siddharth Jadhav New Movie : ‘हुप्पा हुय्या’नंतर सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा दिसणार हनुमान भक्ताच्या भूमिकेत; ‘बजरंगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक चर्चेत

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा हनुमान भक्ताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘बजरंगी’ या मराठी चित्रपटाचा पहिला लुक नुकताच समोर आला असून, पोस्टरने चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे.(Siddharth Jadhav New Movie)

सिद्धार्थ जाधवने यापूर्वी ‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटातून हनुमान भक्ताची भूमिका साकारली होती. आता ‘बजरंगी’मध्येही तो याच धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा आणि कथा वेगळ्या स्वरूपाची असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

‘बजरंगी’च्या पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची मूर्ती दिसत असून, तिच्यासमोर एक तरुण हातात भगवा कपडा घेऊन उभा असल्याचे पाहायला मिळते. पार्श्वभूमीला किल्ला, भगवे ध्वज आणि सोनेरी प्रकाश दिसत असल्याने पोस्टरला भव्य आणि सिनेमॅटिक रूप मिळाले आहे.

पोस्टरमधील तरुणाचा हनुमंताशी नेमका काय संबंध आहे, त्याच्या आयुष्यात कोणती महत्त्वाची घटना घडते आणि या कथेला कोणते वळण मिळते, याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या कथेची उत्सुकता कायम ठेवण्यात आली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केले असून लेखन हेमंत एदलाबादकर यांचे आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

दिग्दर्शक तेजस लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार, ‘बजरंगी’ची कथा एका अशा प्रसंगापासून सुरू होते, जो अनेक प्रश्न निर्माण करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाचा हा प्रवास असून, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमधून कथा पुढे जाते. त्यामुळे सिद्धार्थ जाधवची ‘बजरंगी’मधील भूमिका आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांसाठी नेमका काय अनुभव घेऊन येते, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >