Saturday, September 26, 2026

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरला कारची धडक, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरला कारची धडक, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये शनिवारी (ता. 26) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. टाकळीवाडी शिवारात, गंगापूर तालुक्यात इंटरचेंजपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर नाशिकहून जालन्याकडे जाणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही कारने पुढे जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. (Samruddhi Mahamarg Accident)

हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 449.5 जवळ झाला. प्रतीक रामकिसन जगदाळे (वय 31) हे पत्नी श्रिया (वय 32) आणि मुलगा रुद्रश (वय 2) यांच्यासह पुण्याहून जालन्याकडे जात होते. त्यांची महिंद्रा एक्सयूव्ही कार (क्र. MH 12 YS 1028) होती.

दरम्यान, सुरतहून सेलमकडे जाणारा कंटेनर (क्र. GJ 21 Y 3362) चालक संगप्पा यमगर (वय 32) चालवत होता. मागून आलेल्या कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार कंटेनरच्या मागील बाजूस घुसल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. (Samruddhi Mahamarg Accident)

या अपघातात श्रिया जगदाळे आणि त्यांचा मुलगा रुद्रश यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रतीक जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील क्यूआरव्ही आणि पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरमध्ये अडकलेली कार दोराच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली आणि जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

दरम्यान, माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य आणि पुढील कार्यवाही सुरू केली.(Samruddhi Mahamarg Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >