Sunday, September 27, 2026

Goregaon Mulund Link Road केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार? समोर आली तारीख...

Goregaon Mulund Link Road केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार? समोर आली तारीख...
मुंबई: गोरेगाव आणि मुलुंडवाकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR)प्रकल्पाचा गोरेगाव ते फिल्म सिटी (दादासाहेब फाळके चित्रनगरी) दरम्यान असलेला उड्डाणपुलाच्या महत्त्वाच्या भागाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 1.26 किमी लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. या उड्डाणपुलाची पाहणी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. अतिरिक्त आयुक्तांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी कामामध्ये कंत्राटदाराला अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
या लिंक रोडमुळे मुंबईकरांची मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. लिंक रोडमुळे पश्चिम आणि पुर्व उपनगरांमधील नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. तब्बल 12.20 किलोमीटर लांबीच्‍या या संपूर्ण प्रकल्‍पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्‍यानची प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येईल. शिवाय, वाहतुकदारांच्या इंधन वापरात बचत आणि मुंबईच्‍या वायू गुणवत्‍ता निर्देशांकातही (AQI)सुधारणा होईल. एकंदरीतच, मुंबईकरांचे राहणीमान सुधारण्‍याच्‍या दिशेने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा एक महत्‍त्‍वपूर्ण उपक्रम असल्याचे म्हणता येईल. या प्रकल्‍पाकरिता एमएमआरडीएकडून दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान 3×3 मार्गिकेच्‍या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिंडोशी न्‍यायालयापासून उड्डाणपुलाला सुरुवात होते. जो रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेलजवळून उड्डाणपूल वळून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या उतरतो. या पुलाचे बांधकाम एक स्‍तंभावर पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटचे सेगमेंटल बॉक्‍स गर्डर वापरून करण्‍यात आले आहे. या संपूर्ण पुलाचे बांधकाम 100 टक्‍के पूर्ण झाले आहे. लिंक रोडच्या पुलासाठी एमएमआरडीएकडून एकूण 31 खांबांची उभारणी करण्यात आली असून एकूण 30 स्पॅनचा पुलामध्ये समावेश करण्यात आला आहे.   खांबांवर तुळई बसवणे, डेक स्लॅबचे ओतकाम, शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच मार्गांचे (Approach Roads)कामही पूर्ण करण्यात आले आहे. पुलाच्या उर्वरित कामांमध्ये रंगरंगोटी, दिशादर्शक फलकांची उभारणी, विद्युत खांब बसविणे, थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट्स आयज तसेच ध्वनीरोधक (Noise Barriers)यांचा समावेश असून, ही सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतुकीसाठीची क्षमता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भार चाचणी (Load Test)करण्यात येणार आहे. या चाचणीनंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 15 ऑक्‍टोबर 2026 पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची शक्यता आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या सर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुलाखालील परिसरातील सर्व रस्ते अडथळे (Barricades) तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करावा. परिसरातील राडारोडा आणि घनकचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ आणि वाहतुकीस सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. पुलालगतच्या 7.5 मीटर रुंदीच्या सेवा रस्त्यांचे (Slip Roads)काम तातडीने पूर्ण करावे. शिवाय, पुलाची अंतिम कामे (Finishing Works)गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले.
याशिवाय, पुलावरील आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांशी आवश्यक समन्वय साधून नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्‍यासह महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >