मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या दरीत कोसळली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 39 व्या किलोमीटरजवळ हा अपघात घडला. (Mumbai Pune Expressway)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक तपासात कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जाणाऱ्या टेम्पोला मागून धडक दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. धडकेनंतर दोन्ही वाहने दरीत कोसळली.
अपघातातील मृत व्यक्तीला तातडीने खोपोली म्युनिसिपल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच विविध बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.
व्हीएसआर कंपनीला सत्तेच्या जोरावर वाचविले जात असल्याचा आरोप मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणात व्हीएसआर ...
या दुर्घटनेनंतरही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांसह विविध यंत्रणांनी घटनास्थळी काम केले.
IRB पेट्रोलिंग, देवदूत, डेल्टा फोर्स, अफकॉन्स, महाराष्ट्र सुरक्षा दल, लोकमान्य रुग्णालयाची टीम, 108 रुग्णवाहिका सेवा आणि हेल्प फाउंडेशनचे बचाव पथक घटनास्थळी उपस्थित होते. बचाव पथकांनी अपघातग्रस्त वाहने आणि परिस्थितीची पाहणी करत आवश्यक ती मदत केली.
दरम्यान, या अपघातामागील नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कंटेनर चालकाचा वेग, वाहनावरील नियंत्रण आणि इतर संभाव्य कारणांची माहिती तपासातून समोर येणार आहे.