नागोया : आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मधील महिलांच्या लांब उडी (Long Jump) स्पर्धेत अत्यंत थरारक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सुवर्णपदकाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भारताच्या नामांकित ॲथलीट एन्सी सोजन एडाप्पिल्ली हिचे सुवर्णपदक अवघ्या २ सेंटिमीटरच्या अतिशय सूक्ष्म फरकाने हुकले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत आघाडीवर असलेल्या एन्सीला चीनच्या खेळाडूने शेवटच्या प्रयत्नात मागे टाकल्याने सरतेशेवटी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
शेवटच्या प्रयत्नात चीनची धक्कादायक बाजी
नागोया : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या भारताची स्टार नेमबाज मनू भाकर (Manu Bhakar) हिचे वडील रामकिशन भाकर (ramkishan Bhakar) यांनी जपानमधील आयची-नागोया (Aichi Prefecture and Nagoya) ...
२५ वर्षीय एन्सी सोजनने सुरुवातीपासूनच या स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते. तिने पहिल्याच प्रयत्नात ६.४९ मीटर लांब उडी मारून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला. यानंतर पाचव्या प्रयत्नात अधिक चांगली कामगिरी करत तिने ६.५३ मीटरचा टप्पा पार केला आणि सुवर्णपदकावर भक्कम पकड मिळवली. पाचव्या फेरीअखेर एन्सी अव्वल स्थानीच होती. मात्र, सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात चीनच्या हुआंग यिंगयिंगने ६.५५ मीटरची भन्नाट झेप घेत संपूर्ण समीकरणाचा पोतच बदलला. एन्सीला तिच्या अखेरच्या प्रयत्नात ६.४९ मीटरपर्यंतच मजल मारता आल्याने तिला रौप्यपदक मिळाले. सुवर्ण निसटले असले, तरी सलग दुसऱ्या आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक जिंकून एन्सीने आपली अप्रतिम सातत्यपूर्ण कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
शाइली सिंहचे कांस्यपदकही थोडक्यात हुकले
दुसऱ्या बाजूला भारताची दुसरी युवा खेळाडू शाइली सिंह हिच्या हातातूनही कांस्यपदक अगदी शेवटच्या क्षणी निसटले. शाइलीने ६.४१ आणि त्यानंतर ६.४२ मीटर उडी मारत बराच काळ तिसरे स्थान टिकवून ठेवले होते. परंतु, चीनच्या तान मेंगयीने तिच्या अंतिम प्रयत्नात ६.४६ मीटर अंतर कापून शाइलीला चौथ्या स्थानावर ढकलले आणि कांस्यपदक आपल्या नावावर केले.
हवामानाचा फटका अन् पंचांसोबत वाद
शाइली सिंहसाठी हा सामना अनेक अर्थांनी आव्हानात्मक ठरला. मैदानावरील जोरदार वारा आणि अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे तिला आपल्या टेक-ऑफचा योग्य अंदाज घेताना अडचण येत होती. यामुळे अनेकदा तिची उडी टेक-ऑफ लाईनच्या बरीच आधीच घेतली गेली. एका प्रयत्नाच्या गुणांकनाबाबत समाधानी नसल्याने शाइलीने मैदानातील पंचांसोबत बराच वेळ चर्चा केली, पण त्याचा निर्णय तिच्या बाजूने लागला नाही. अखेरच्या प्रयत्नांमधील या नाट्यमय घडामोडींमुळे चीनने सुवर्ण आणि कांस्य अशा दोन्ही पदकांवर कब्जा केला, तर भारताच्या पदरात एक रौप्यपदक पडले.