Monday, September 28, 2026

Tech News : 5G महागल्याने 4G स्मार्टफोनची मागणी वाढली; 2026 मध्ये बाजारातील वाटा 13% होण्याचा अंदाज

Tech News : 5G महागल्याने 4G स्मार्टफोनची मागणी वाढली; 2026 मध्ये बाजारातील वाटा 13% होण्याचा अंदाज

मुंबई : भारतात 5G स्मार्टफोनची किंमत वाढत असताना ग्राहक पुन्हा एकदा स्वस्त 4G फोनकडे वळताना दिसत आहेत. Counterpoint Researchच्या अहवालानुसार, 2026 मध्ये भारतातील 4G स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये 3% वाढ होण्याचा अंदाज आहे. 2025 मध्ये 4G स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये तब्बल 48% घट झाली होती. (Tech News)

अहवालानुसार, 2025 मध्ये भारतातील एकूण स्मार्टफोन बाजारात 4G फोनचा वाटा 11% होता. हा वाटा 2026 मध्ये वाढून 13% होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, 2027 मध्ये 4G स्मार्टफोनचा बाजारातील वाटा 15% पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज Counterpoint Researchने व्यक्त केला आहे.

5G महागल्याचा 4G फोनला फायदा

स्मार्टफोनमधील मेमरी आणि इतर घटकांच्या किमती वाढल्यामुळे 4G आणि 5G फोनमधील किंमतीतील फरक वाढला आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये फोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी 5G मॉडेल्स महाग ठरत आहेत. परिणामी, ग्राहकांकडून स्वस्त आणि आवश्यक फीचर्स देणाऱ्या 4G फोनला पसंती मिळत आहे.

विशेषतः ₹10,000 पेक्षा कमी आणि ₹10,000 ते ₹20,000 या बजेट सेगमेंटमध्ये 4G फोनची मागणी वाढत आहे. या किंमत श्रेणीत 4G मॉडेल्स उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची संख्या 2025 मधील 2 वरून 2026 मध्ये 12 झाली आहे.(Tech News)

Counterpoint Researchच्या मते, 4G आता केवळ महागाईमुळे निर्माण झालेला तात्पुरता पर्याय राहिलेला नसून, कमी किमतीत चांगले फीचर्स आणि पुरेशी कामगिरी देणारा पर्याय म्हणून त्याची बाजारातील भूमिका वाढत आहे.

स्मार्टफोनच्या किमती वाढल्याने ग्राहकांवर परिणाम

2026 मध्ये भारतातील एकूण स्मार्टफोन बाजारावर वाढत्या घटकांच्या किमतीचा दबाव दिसत आहे. Counterpointनुसार, 2026च्या दुसऱ्या तिमाहीत भारतातील स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 10% घट झाली. वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक नवीन फोन खरेदी पुढे ढकलत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.(Tech News)

यामुळे स्मार्टफोन कंपन्याही आपल्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहेत. कमी बजेटमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक 4G मॉडेल्स बाजारात आणले जात आहेत, तर 5G फोन तुलनेने उच्च किंमत श्रेणीत जात आहेत.

दरम्यान, जागतिक स्तरावरही $200 पेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये 2025 ते 2030 दरम्यान सुमारे 40% घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या घटकांच्या किमती आणि स्वस्त फोनसाठी आवश्यक असलेल्या किमान तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे या सेगमेंटवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.(Tech News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >