Nashik Crime : न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असलेल्या नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातूनच मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आवारात बनावट कागदपत्रे तयार करून विंचूर येथील कोट्यवधी रुपयांची शेतजमीन तारण ठेवत एका खासगी बँकेकडून 3 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका महिला संस्थेच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आवारात कट रचल्याचा आरोप
निफाड तालुक्यातील विंचूर येथील शेतकरी आणि व्यावसायिक संतोष मुरलीधर उशीर (वय 51) हे टॉप सेल कॉर्पोरेशन या भागीदारी फर्मचे भागीदार आहेत. पोलिस तक्रारीनुसार, 18 मार्च 2025 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत संशयितांनी सीबीएस रोडवरील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात एकत्र येऊन कथित कट रचला. संतोष उशीर यांची कोणतीही संमती, सही किंवा अंगठ्याचा ठसा नसताना ‘अॅडमिशन कम रिटायरमेंट’ नावाचा बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. या कागदपत्राच्या आधारे संतोष उशीर हे फर्ममधून निवृत्त झाल्याचे दाखवण्यात आले. तसेच त्यांच्या जागी मनीषा दत्तात्रय जाधव यांना नवीन भागीदार म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
Nashik : गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांऐवजी डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या अतिआवाजाला प्राधान्य देणाऱ्या गणेश मंडळांवर नाशिक पोलिसांनी कारवाईचा ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे 3.50 कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव
यानंतर या कथित बनावट दस्तऐवजांचा वापर करून मे. कृषीसाधना महिला शेतमाल उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था या नावाने अशोका मार्गावरील एका खासगी बँकेच्या शाखेत 3 कोटी 50 लाख रुपयांच्या कर्जासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. कर्जासाठी टॉप सेल कॉर्पोरेशनच्या मालकीची विंचूर येथील मौल्यवान शेतजमीन बँकेकडे तारण ठेवल्याचा आरोप आहे. मूळ जमीनमालकाच्या संमतीशिवाय जमीन तारण ठेवून बँकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
हा प्रकार लक्षात आल्यानंतर संतोष उशीर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित मनीषा दत्तात्रय जाधव, साधना जाधव, दीपक शशिकांत खैरनार, युवराज श्रीपत सोनवणे आणि मोनीश गोविंदराव देवरे (रा. गोविंद नगर, नाशिक) यांच्यावर फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील कागदपत्रे, कर्जाचा प्रस्ताव, जमिनीचे तारण आणि संबंधित व्यवहारांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे नेमकी कुठे आणि कशी तयार करण्यात आली, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.






