Tuesday, September 29, 2026

Ketan Agarwal Murder Case : 80 लाखांचे दागिने, 28 महागडे ड्रेस अन् पुण्यातील अलिशान हॉटेल्स...; केतन हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

Ketan Agarwal Murder Case : 80 लाखांचे दागिने, 28 महागडे ड्रेस अन् पुण्यातील अलिशान हॉटेल्स...; केतन हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

पुणे : केतन विशाल अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात त्याच्या लग्नाच्या तयारीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपपत्रात केतनचे वडील विशाल देवीचंद अग्रवाल यांच्या पुरवणी जबाबाचा समावेश करण्यात आला आहे. या जबाबातून केतनच्या लग्नासाठी कुटुंबाने मोठी तयारी केली असल्याचे समोर आले आहे. ( Ketan Agarwal Murder Case)

विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, एका जवळच्या नातेवाईकाच्या माध्यमातून केतनसाठी प्रवीण गोयल यांची मुलगी सिया गोयल हिचे स्थळ सुचवण्यात आले होते. 11 फेब्रुवारी 2026 रोजी पुण्यातील वेस्टिन हॉटेलमध्ये दोन्ही कुटुंबांची भेट झाली. याच भेटीदरम्यान केतन आणि सिया यांचा रोका सोहळाही पार पडला. या कार्यक्रमानंतर केतन खूप आनंदी होता, असे त्याच्या वडिलांनी जबाबात सांगितले आहे. यावेळी अग्रवाल कुटुंबाकडून सियाला सुमारे 7 ते 8 लाख रुपये किमतीचे 28 ड्रेस भेट देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

साखरपुड्याचा 80 लाखांचा दागिने

यानंतर 19 फेब्रुवारी 2026 रोजी पुण्यातील रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये केतन आणि सियाचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमात अग्रवाल कुटुंबाकडून सियाला सुमारे 80 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने देण्यात आल्याचा दावा जबाबात करण्यात आला आहे.

केतन हत्या प्रकरणात अग्रवाल कुटुंबाच्या जबाबाने खळबळ

केतन हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या लग्नासाठी मोठा खर्च करण्याची तयारी कुटुंबाने केली होती. राजस्थानमधील उदयपूर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्न करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या लग्नासाठी सुमारे 4 ते 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. रिसॉर्ट बुक करण्यासाठी 25 लाख रुपयांचा चेक दिल्याचेही वडिलांनी सांगितले आहे. ( Pune Crime News)

मात्र, केतनच्या हत्येनंतर लग्नाची ही तयारी थांबली. विशाल अग्रवाल यांनी आपल्या जबाबात सिया आणि तिचा कथित प्रियकर चेतन बावुलाल चौधरी यांच्यावर केतनच्या हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, केतनच्या हत्येनंतर काही काळातच विशाल अग्रवाल यांचे वडील देवीचंद यांचेही निधन झाले. मुलगा आणि वडील अशा दोघांना गमावल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळल्याचे विशाल अग्रवाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >