Tuesday, September 29, 2026

Matang Samaj : अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक

Matang Samaj : अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक

- सीएसएमटी परिसरात आंदोलन; हलगी घेऊन बांधव उतरले रस्त्यावर, बीएमसी आणि मंत्रालयाकडे जाणारे रस्ते बंद

मुंबई : अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी सीएसएमटी परिसरात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हलगी वाजवत मोठ्या संख्येने आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्या काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून, परिसरात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.

उपवर्गीकरणाचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. उपवर्गीकरणाबाबत सरकारकडून निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबामुळे समाजात असंतोष असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. शासन आदेश निघेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. आमदार अमित गोरखे आणि सुनील कांबळे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दोन ते अडीच महिन्यांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा मातंग समाजाच्या समन्वयकांकडून करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.

उपवर्गीकरणाचा निर्णय प्रलंबित असल्याने राज्यातील आगामी नोकरभरतीत मातंग समाजातील तरुणांना संधी मिळण्याबाबतही समाजाच्या नेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नोकरभरती सुरू होण्यापूर्वी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी यापूर्वी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर आता राजधानी मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी सर्वपक्षीय मातंग नेते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. सरकारने उपवर्गीकरणाबाबत तातडीने निर्णय घेऊन शासन आदेश जारी करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बीएमसी मुख्यालय आणि मंत्रालयाकडे जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने या परिसरात वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >