Nashik : बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला असून, नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. नाशिक विभागातील बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आतापर्यंत ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आयडी संशयास्पद असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्वाधिक ६३८ संशयित जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तब्बल ४० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची १० विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
आठ प्रमुख संशयितांना अटक
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत नितीन उपासनी, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संजय गरूड, प्रशांत वाडीले, किरण पाटील, राहुल पवार, दीपक गरूड आणि तुषार साळुंके या आठ प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी गेल्या काही महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आलेला त्याचा जामीन अर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळला आहे.
संशयितांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी
सोमवारी (दि. २८) नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणातील संशयितांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातील पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, धुळ्यातून अटक करण्यात आलेल्या जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या जामीन अर्जावर ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
Nashik : मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे आठवडी बाजारात भेळभत्त्यासोबत खाल्लेल्या दूषित चटणीमुळे १८६ जणांना विषबाधा झाल्याचे प्राथमिक आरोग्य ...
दोन गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास
नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्याचा क्रमांक १६४/२०२५ असून, या प्रकरणात आतापर्यंत ११२ संशयित निष्पन्न झाले आहेत. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या निलंबनानंतर या गुन्ह्याचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्याचा क्रमांक २१६/२०२६ असून, त्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
चार जिल्ह्यांत पोलिसांची विशेष पथके
पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी १० विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांकडून संशयितांची चौकशी, कागदपत्रांची पडताळणी आणि शालार्थ आयडीच्या निर्मिती प्रक्रियेचा तपास केला जात आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास यंत्रणेकडून विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात आणि तपासातून नेमकी कोणती माहिती उघड होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.





