Wednesday, September 30, 2026

Nitesh Rane : दुष्काळात शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मच्छिमारांनाही देणार; मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

Nitesh Rane : दुष्काळात शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मच्छिमारांनाही देणार; मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

२०२८ पासून मुंबईत ‘वॉटर मेट्रो’ कार्यान्वित करणार

मुंबई : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांवरही होतो. महाराष्ट्र हे मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे एकमेव राज्य असून शेतकऱ्यांसाठी घेतले जाणारे निर्णय, लाभ आणि पॅकेज मच्छिमारांनाही लागू होणार आहेत. या संकटातून राज्यातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी महायुती सरकार कामाला लागले असून पारंपरिक मच्छिमारांच्या दोन हातांना काम देण्यासाठीही पूर्ण तयारी आहे, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिली.

एका हिंदी साप्ताहिकाच्या वतीने मुंबईतील हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे आयोजित ‘सुशासन संवाद’ कार्यक्रमांतर्गत ‘छत्रपती संवाद’ या सत्रात राणे यांची मुलाखत झाली. या वेळी त्यांनी राज्यातील किनारपट्टी, जलवाहतूक, मच्छिमारांसाठीच्या योजना आणि दुष्काळजन्य परिस्थितीतील मदतीबाबत भूमिका मांडली. मंत्री राणे म्हणाले, २०२८ मध्ये पुन्हा मुंबईत ‘सुशासन संवाद’ आयोजित केला तर त्या वेळी आज कोस्टल रोडने कार्यक्रमस्थळी पोहोचण्याऐवजी ‘मुंबई वॉटर मेट्रो’ने येथे पोहोचता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मुंबईच्या संपूर्ण एमएमआर क्षेत्राला वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याची तयारी सुरू आहे.(Fishermen Loan Waiver)

२०२८ नंतर नरीमन पॉइंटहून वांद्रे तसेच दहिसरपर्यंत जलवाहतुकीच्या माध्यमातून जाता येईल, असे राणे यांनी सांगितले. ताज हॉटेलसमोर ‘रेडिओ क्लब जेट्टी’ उभारण्यात येत असून तेथून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या ताज हॉटेल परिसरातून नवी मुंबई विमानतळावर जाण्यास सुमारे एक तास २० मिनिटे ते एक तास ४० मिनिटे लागतात. वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर हे अंतर १४ मिनिटांत पार करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईचा चेहरा बदलण्याचे काम सुरू असून भविष्यात मुंबई एमएमआरपुरते जलवाहतुकीचे जाळे मर्यादित न ठेवता संपूर्ण किनारपट्टीला जलवाहतुकीने जोडण्याची तयारी असल्याचे राणे यांनी सांगितले. मुंबईहून कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडपर्यंत समुद्रमार्गे संपर्क वाढविण्याचे नियोजन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राची ताकद ओळखून त्याचा अभ्यास केला होता. त्यांचे मावळे म्हणून आपण मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असून येत्या काळात समुद्राची संपूर्ण ताकद वापरण्याचे काम केले जाईल, असेही राणे म्हणाले.

राज्यात सध्या पाणी आणि दुष्काळाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या संकटातून राज्यातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार कोणत्याही गोष्टीपासून मागे न हटता काम करीत असून त्या आत्मविश्वासाने सर्वजण कामाला लागले आहेत, असेही राणे यांनी नमूद केले.

दुष्काळात मच्छिमारांना वाऱ्यावर सोडणार नाही

  • राणे म्हणाले, मी मत्स्यव्यवसाय विभागाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा विभागाचा अर्थसंकल्प सुमारे २१२ कोटी रुपये होता. आता दीड ते पावणेदोन वर्षांच्या कालावधीत विभागाचा अर्थसंकल्प १ हजार २४० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला आहे. मच्छिमारांना योग्य पद्धतीने बळ द्यायचे असेल तर राज्याची स्वतंत्र योजना असणे आवश्यक असल्याने मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ आणण्यात आली. पारंपरिक मच्छिमारांकडे तंत्रज्ञानयुक्त नौका नसतात आणि अद्याप अनेक मच्छिमार तंत्रज्ञानाच्या वापराकडे वळलेले नाहीत. अशा मच्छिमारांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.(Fishermen Loan Waiver)
  •  ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ शेवटच्या मच्छिमारापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचविण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग दिवस-रात्र काम करीत असल्याचे राणे म्हणाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मी जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला असून, त्यानंतर अहिल्यानगरचा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. दर दोन दिवसांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेट देऊन त्या जिल्ह्यातील मच्छिमार, धरणे आणि तलावांची माहिती घेतली जात आहे. दुष्काळामुळे या जलस्रोतांवर आणि त्यावर अवलंबून असलेल्या मच्छिमारांवर झालेला परिणाम समजून घेतला जात आहे. त्यासाठी प्रथम संपूर्ण माहिती आणि वस्तुस्थिती संकलित केली जात असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मच्छिमारांना मदत करण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >