
पुणे : तब्बल 11 वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या कारखान्याला पुन्हा उभारी मिळणार आहे. या कारखान्याच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 1,500 कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात चालकांना थेट मालकी हक्क देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘भारत टॅक्सी’ या सहकारी सेवेचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे काम सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.
110 एकर क्षेत्रात औद्योगिक पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचा पुनर्निर्माण प्रकल्प सुमारे 110 एकर क्षेत्रात उभारण्यात येणार आहे. साखर उद्योग, डेअरी, इथेनॉल, बायोगॅस आणि जैवाधारित उद्योगांसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री येथे तयार केली जाणार आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचीही साथ मिळणार आहे. हा प्रकल्प केवळ बंद पडलेल्या कारखान्याचे पुनरुज्जीवन नसून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047 या संकल्पनांना बळ देणारा ठरेल. स्वदेशी उत्पादन, कुशल मनुष्यबळ आणि ग्रामीण उद्योगांना यामुळे मोठी चालना मिळेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला
कोल्हापूरमध्ये दिलेला शब्द पाळत अमित शाह यांनी या प्रकल्पासाठी 1,500 कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिल्याचे शिंदे यांनी नमूद केले. सहकार क्षेत्रातील मक्तेदारी आणि अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनांचे लाभ पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. साखर उद्योगाच्या अडचणी सोडवताना 10 हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकरासंदर्भातील प्रश्न मार्गी लावून कारखान्यांना दिलासा देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांचीही आठवण काढली.
मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या ...
‘भारत टॅक्सी’मुळे चालकच बनणार मालक
पुण्यात सुरू झालेल्या ‘भारत टॅक्सी’ या सहकारी उपक्रमामुळे चालकांना स्वतःच्या व्यवसायाचे मालक होण्याची संधी मिळणार आहे. मध्यस्थ आणि कमिशनची व्यवस्था टाळून चालकांच्या कष्टाचा मोबदला थेट त्यांना मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘सारथी दीदी’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांनाही टॅक्सी व्यवसायात संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला केंद्राकडून मिळालेल्या निधीचा उल्लेख
यूपीए सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला सुमारे 2 लाख कोटी रुपये, तर एनडीए सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात 15 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे ठामपणे मागणी केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन असून उद्योग, स्टार्टअप आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. विकासकामांवर टीका करणाऱ्यांना टोला लगावत चांगल्या कामाचे स्वागत करण्याची वृत्ती असली पाहिजे, असेही ते म्हणाले.
सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती, सहकार क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.





