Wednesday, September 30, 2026

BMC : मागील २८ दिवसांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांकडून १८.७० लाखांचा दंड वसूल; तब्बल १,३३६ प्रकरणांमध्ये महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

BMC : मागील २८ दिवसांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांकडून १८.७० लाखांचा दंड वसूल; तब्बल १,३३६ प्रकरणांमध्ये महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने १ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन उपविधी, २०२५ अंतर्गत एकूण १,३३६ प्रकरणांमध्ये कारवाई करून १८,७०,३५० रुपये इतका दंड वसूल केला आहे. सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याशी संबंधित विविध उल्लंघनांवर ही कारवाई करण्यात आली. अस्वच्छतेसंदर्भात विविध प्रकरणांमध्ये हा दंड आकारुन ऑनलाईन पध्दतीने आकारत वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे या दंडाची रक्कम थेट महापालिकेच्या खात्यात जमा झाली आहे.

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली घनकचरा व्यवस्थापन उपविधी २०२५ची अंमलबजावणी करून अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.अंगण आणि लगतचा परिसर स्वच्छ न ठेवल्याची प्रकरणे ही सप्टेंबर महिन्यातील २८ दिवसांच्या या कारवाईत ४४३ प्रकरणांमध्ये एकूण ७,८०,००० रुपये एवढा दंड आकारण्यात आला. यामध्ये मालक किंवा रहिवाशांविरुद्धच्या २०३ प्रकरणांमध्ये २,५०,३००, तर इतर जबाबदार व्यक्तींविरुद्धच्या २४० प्रकरणांमध्ये ५,२९,७०० इतका दंड आकारण्यात आला.(Mumbai Cleanliness)

बांधकाम व पाडकाम कचऱ्याची अनधिकृत हाताळणी आणि विल्हेवाट याविरुद्धही महानगरपालिकेने कारवाई तीव्र केली आहे. बांधकाम व पाडकाम कचऱ्याशी संबंधित ३५ प्रकरणांमध्ये एकूण ५,९८,२५० इतका दंड आकारण्यात आला. अनधिकृत किंवा निर्धारित न केलेल्या ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा टाकल्याच्या २९ प्रकरणांमध्ये ४,५३,०५० रुपये, तर मंजूर आराखड्याशिवाय अशा कचऱ्याची वाहतूक केल्याच्या सहा प्रकरणांमध्ये १,४५,२००रुपये इतका दंड आकारण्यात आला.

रस्ते, गल्ल्या, पदपथ, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल ३३० प्रकरणांमध्ये १,६७,२००रुपये इतका दंड आकारण्यात आला. वर्गीकरण न केलेला कचरा सुपूर्द केल्याच्या १८४ प्रकरणांमध्ये एकूण १,६८,३०० रुपये दंड आकारण्यात आला. यामध्ये वैयक्तिक नागरिकांविरुद्धची ५७ प्रकरणे आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांविरुद्धची १२७ प्रकरणे समाविष्ट आहेत.(Mumbai Cleanliness)

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी किंवा शौच करणे, उपद्रव निर्माण होईल अशा पद्धतीने प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे, सार्वजनिक ठिकाणी वाहने किंवा भांडी धुणे, कचरा जाळणे, विक्रेते व फेरीवाल्यांकडून होणारे उल्लंघन, पाळीव प्राण्यांमुळे होणारी अस्वच्छता तसेच सार्वजनिक मेळावा किंवा कार्यक्रमानंतर निर्धारित वेळेत परिसर स्वच्छ न करणे या उल्लंघनांसाठीही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अंमलबजावणीमध्ये अधिक पारदर्शकता आणि एकसमानता आणण्यासाठी सर्व सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांना अधिकृत महानगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत निर्धारित मोबाईल ॲप्लिकेशन आणि पोर्टेबल प्रिंटरचा वापर करून उपविधींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रणालीद्वारे उल्लंघनाचे छायाचित्रण, व्यवहारांची डिजिटल नोंद आणि जागेवरच छापील पावती देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन भरलेली दंडाची रक्कम थेट महानगरपालिकेच्या खात्यात जमा होईल.(Mumbai Cleanliness)

महापालिका उपायुक्त किरण दिघावकर (घनकचरा व्यवस्थापन) यांनी याबाबत बोलतांना स्पष्ट केले की, या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत शिस्त आणि जबाबदारी निर्माण करणे, कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि मुंबईच्या स्वच्छतेमध्ये दृश्य व कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणणे हा आहे. नागरिक, व्यापारी आस्थापना, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे घटक, कंत्राटदार, विक्रेते आणि इतर संबंधितांनी नियमांचे पालन करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >