Tuesday, September 29, 2026

Prahaar Movie : ‘प्रहार’ चित्रपटाच्या ट्रेलरचा अनावरण सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष उपस्थिती

Prahaar Movie : ‘प्रहार’ चित्रपटाच्या ट्रेलरचा अनावरण सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष उपस्थिती
मुंबई : ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेता राजकुमार राव, चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुंबईच्या सुरक्षेसाठी दहशतवाद्यांशी लढताना शौर्य दाखवणाऱ्या पोलिसांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यायालयात अनेक वर्षे चाललेली लढाई या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिस आणि न्यायव्यवस्थेने कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम केले. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेमुळे 26/11 हल्ल्यातील शहीदांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईला महत्त्वाचे स्थान मिळाले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 26/11 च्या रात्री दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या पोलिसांच्या शौर्याला यावेळी आदरांजली वाहण्यात आली. या हल्ल्यामागील दहशतवादी कारवायांची वस्तुस्थिती जगासमोर येणे महत्त्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासासोबतच 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित न्यायालयीन लढाईवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >