Thursday, October 1, 2026

Nitesh Rane : मावळ्यांच्या जागी 'कॉकरोच' दाखवणे हा शिवरायांचा अपमान ! मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

Nitesh Rane : मावळ्यांच्या जागी 'कॉकरोच' दाखवणे हा शिवरायांचा अपमान ! मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माफी मागावी

मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मावळ्यांच्या जागी कॉकरोच दाखविणे हा शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अपमान असून, असा प्रकार महाराष्ट्रात, मुंबईत कोणताही शिवप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी आणि देशभक्त सहन करणार नाही", अशी भूमिका मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी मांडली. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकाराबद्दल माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजप प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजित दीपके आणि सौरभ दास यांच्या भूमिकेवर भाष्य केले. दीपके किंवा दास यांच्याशी आपला व्यक्तिगत प्रश्न नसून, ते उमर खालिदचे समर्थन करतात तसेच देशविरोधी शक्तींना पाठिंबा देतात, यावर आपला आक्षेप असल्याचे राणे म्हणाले. जंतरमंतरवरील आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘सर तन से जुदा’च्या घोषणा, तसेच देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये झाल्याचा आरोप त्यांनी केला.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाकडे पाहिले पाहिजे, असे राणे म्हणाले. महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज ही ओळख आणि अस्मिता आहे. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेमध्ये मावळ्यांच्या जागी कॉकरोच दाखविणे हा शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे राणे म्हणाले. अभिजित दीपके यांनी स्वतःच्या ‘एक्स’ खात्यावर असा फोटो प्रसिद्ध केल्याचे सांगत, हा प्रकार महाराष्ट्रात येऊन करण्यात येत असल्याने त्याबद्दल दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकशाहीच्या नावाने आंदोलन करणाऱ्यांनी आधी देशातील लोकशाही व्यवस्था लक्षात घ्यावी, असेही राणे म्हणाले. गेल्या १२ वर्षांत लोक बोलण्यास घाबरत होते, असा दावा केला जात असल्याबाबत विचारले असता, लोकशाही नसती तर जंतरमंतरवर आंदोलन करता आले नसते, असे त्यांनी सांगितले. भारताला लोकशाहीप्रधान देश म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता असल्याचे सांगत, पाकिस्तान किंवा चीनमध्ये अशा प्रकारचे आंदोलन करता आले असते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उमर खालिदला सरकारने तुरुंगात का ठेवले, असा प्रश्न उपस्थित करताना तो देशविरोधी आणि संविधानविरोधी असून शरियाला समर्थन करणारा असल्याचा आरोप राणे यांनी केला. अशा शक्तींना समर्थन देणारे लोक मुखवटे घालून भारताच्या विरोधात भूमिका घेत असतील, संविधान आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत असतील, तर ते नेमका कोणाचा अजेंडा चालवत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

आम्ही शिवरायांचे मावळे, जशासतसे उत्तर देऊ

- आंदोलन करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचे राणे यांनी सांगितले. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हा वेगळा मुद्दा असल्याचे ते म्हणाले.

- ‘सर तन से जुदा’च्या घोषणा, देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि आता शिवरायांच्या प्रतिमेचा वापर करून मावळ्यांच्या जागी कॉकरोच दाखविणे, यामागचा अजेंडा काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

- शिवसेना, काँग्रेस किंवा भाजप यांचा राजकीय वाद नंतरचा विषय आहे. त्यापूर्वी आपण शिवरायांचे मावळे आहोत, असे सांगत या प्रकाराचे उत्तर द्यावे लागेल, असे राणे म्हणाले. शिवाजी महाराजांचा अपमान करून त्याला आंदोलनाचे स्वरूप दिले जात असेल तर त्याला विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे बंधू औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या समर्थकांच्या सोबत

- छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आंदोलनाला समर्थन देत असतील, तर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार कसे, असा सवाल राणे यांनी केला. यापूर्वी शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनात कुणाल कामरा सहभागी झाल्याचा उल्लेख करून, त्याने सीता मातेबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाकरे बंधूंनी आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

- हिंदू देवी-देवतांबद्दल बोलण्याची आणि आता शिवरायांबद्दल बोलण्याचीही त्यांची हिंमत उरलेली नाही, अशी टीका राणे यांनी केली. ठाकरे बंधू औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या समर्थकांच्या सोबत दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशविरोधी शक्तींशी त्यांची भाषा जुळत असल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >