Prahaar : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी आणि त्यानंतरची कायदेशीर लढाई मांडणाऱ्या ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात राजकुमार रावने ॲड. उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सुप्रसिद्ध मराठी अभिनेता ललित प्रभाकरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे.सोबतच ‘प्रहार‘ या सिनेमात ‘चला हवा येऊ द्या‘ फेम अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरेचीही भूमिका
‘प्रहार’च्या ट्रेलरनंतर चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याच चित्रपटात अभिनेता भारत गणेशपुरे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारत गणेशपुरे याने या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या पात्राचं नेमकं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. भारत गणेशपुरे पहिल्यांदाच अशा गंभीर आणि कोर्टरूम ड्रामामध्ये दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
मुंबई: आध्यात्मिक गुरू नीम करौली बाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. अवघ्या 1.5 कोटी ते 2 कोटीच्या ...
कसा आहे ‘प्रहार’चा ट्रेलर ?
‘प्रहार’चा ट्रेलर २६/११च्या त्या काळ्या रात्रीची आठवण करून देणाऱ्या दृश्यांनी सुरू होतो. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या हल्ल्यात आपल्या आईला गमावलेली एक निष्पाप मुलगी न्यायालयात अजमल कसाबविरोधात साक्ष देताना दिसते. त्यानंतर कथानक न्यायालयीन लढाईकडे वळतं. उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेतील राजकुमार राव कसाबला कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देण्यासाठी लढताना दिसतो. ट्रेलरमध्ये राजकुमार रावचा गंभीर आणि प्रभावी अंदाज पाहायला मिळतो. त्याचबरोबर ललित प्रभाकरने साकारलेल्या कसाबच्या भूमिकेचीही चर्चा होत आहे. त्याचा लूक आणि देहबोली प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘प्रहार’मध्ये कलाकारांची मोठी फौज
राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत या चित्रपटात जयदीप अहलावत, वामिका गब्बी, सिकंदर खेर आणि आशिष विद्यार्थी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २६/११ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरची ही कोर्टरूम ड्रामा कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





