मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एसटीच्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेतील पास आता ऑनलाइन काढता येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पाससाठी आगारात जाऊन रांगेत उभे राहण्याची किंवा हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची गरज भासणार नाही.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेतील ४ दिवस आणि ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच मोबाईल ॲप्लिकेशनवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
घरबसल्या काढता येणार पास
ऑनलाइन पास काढण्यासाठी प्रवाशांना आवश्यक माहिती भरावी लागणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पास ऑनलाइन उपलब्ध होईल. प्रवाशाला हा पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात दाखवता येणार आहे. यामुळे पास काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत ...
QR कोडद्वारे होणार पासची तपासणी
ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या पासवर QR कोड देण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे QR कोड स्कॅन करून पासची तपासणी केली जाईल. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता आणि इतर आवश्यक माहिती ईटीआयएम मशीनवर दिसणार आहे. यासोबतच प्रवाशाने सादर केलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी केली जाईल. सर्व माहिती योग्य आढळल्यानंतरच प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे.
आगारातील गर्दी कमी होण्यास मदत
ऑनलाइन पास सुविधेमुळे प्रवाशांना आगारात जाऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता कमी होणार आहे. विशेषतः सुट्टीच्या काळात आणि पर्यटनाच्या हंगामात या सुविधेचा प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. या नव्या सुविधेची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागीय कार्यालये, आगार आणि स्थानिक पातळीवर आवश्यक जनजागृती करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत.
डिजिटल सुविधेच्या माध्यमातून ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजना अधिक सुलभ करण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. ऑनलाइन पासमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच पास वितरणाची प्रक्रिया अधिक आधुनिक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.