मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पाळत एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून शुक्रवारी यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत.
एमपीएससीच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने ३० सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी हरपाळकर यांची तत्काळ बदली करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर शासनाने त्यानुसार कार्यवाही केली आहे.
औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतर एमपीएससीच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची तसेच आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान, सप्टेंबरमध्ये नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली होती. या प्रकाराचा विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध केला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणे आणि त्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असल्याची भूमिका काही विद्यार्थी संघटनांनी घेतली होती.
मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत ...
आयोगाच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एमपीएससीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या कार्यकाळातील कारभाराची तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. तसेच परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, परीक्षापद्धतीत सुधारणा करणे आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविणे यासंदर्भातही निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.






