मुंबई : मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील तपास आणि दिशा सालियन प्रकरणातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी करून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी केली. आदित्य ठाकरे हे देशाबाहेर पलायन करू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
कणकवली येथे माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी अभिनेता डिनो मोरिया याच्यावर मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात झालेल्या कारवाईचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. या प्रकरणातील तपासात डिनो मोरिया याचे नाव समोर आले असून, त्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत तपासाची दिशा जाऊ शकते. दिशा सालियन प्रकरणातही डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे राणे यांनी सांगितले.
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनात उमर खालिद आणि ...
मिठी नदी प्रकरणात तपास पुढे जात असताना आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढत असल्याचा दावा राणे यांनी केला. त्यामुळे अटकेची शक्यता लक्षात घेता आदित्य ठाकरे देश सोडून जाऊ शकतात, असे राणे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या नावाने लूक आउट नोटीस काढावी आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांच्या विमानाच्या तिकिटांचे आरक्षण झाल्याची माहिती आपल्याकडे असल्याचेही राणे यांनी सांगितले. विविध प्रकरणांतील तपास पुढे जात असताना देश सोडून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने वेळीच पावले उचलावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. या मागणीसाठी आपण स्वतः सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.