मुंबई : मराठी भाषा फक्त स्वाभिमान आणि भावनेचा विषय न राहता ज्ञानाची भाषा बनवायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तिचा वापर वाढविणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग, अवकाश तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये मराठीसाठी व्यवस्था विकसित करण्याबरोबरच डिजिटल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात मराठी आशय निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६’च्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचे संवर्धन आणि प्रसार याबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगाशी तिची सांगड घालणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, राज्य सरकारने ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
एखादी भाषा लोप पावली तर तिच्याबरोबर त्या भाषेशी जोडलेली संस्कृती, विचार, सभ्यता आणि परंपराही धोक्यात येतात. त्यामुळे ‘भाषा जिवंत राहील का?’ यापेक्षा ‘ती भाषा आपण जिवंत ठेवणार आहोत का?’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे फडणवीस म्हणाले. भाषा जिवंत आणि समृद्ध ठेवण्यासाठी भाषेचा वापर, भाषेचा वावर आणि भाषेचे संशोधन या तीन बाबी सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे संशोधन, संवर्धन आणि प्रसाराला चालना मिळाली असून आता जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत ती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि ...
संवादाची माध्यमे बदलत असून डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे बदलत्या डिजिटल युगाशी जुळवून घेत ‘डिजिटल मराठी’ विकसित करणे आवश्यक आहे. मराठी भाषा विभागाने या दिशेने काम सुरू केले असून, एआयच्या क्षेत्रातही मराठीचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. स्पीच-टू-टेक्स्टसारख्या तंत्रज्ञानामुळे मराठीसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. ओटीटी आणि समाजमाध्यमांवर मराठी आशय वाढविण्याबरोबरच डिजिटल व्यासपीठांवर मोठ्या प्रमाणात मराठी कंटेंट उपलब्ध झाला पाहिजे. मराठीतील अभिजात साहित्य केवळ मराठी भाषिकांपुरते मर्यादित न राहता अन्य भाषिकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बोलीभाषा मराठीचे वैभव
मराठीची ताकद एकट्या प्रमाण भाषेत नसून तिच्या विविध बोलींमध्येही आहे. कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, रायगडी, आगरी, धनगरी आणि झाडमुळी यांसारख्या बोलींचे वैविध्य जपणे गरजेचे आहे. या बोलींमध्ये निर्माण होणारे साहित्य, साहित्य संमेलने आणि साहित्यिकांचे योगदान हे मराठीचे मोठे वैभव असल्याचे फडणवीस म्हणाले. मराठी शब्दसंपत्तीचा विस्तार करण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांमध्ये मोठ्या प्रमाणात शब्दसंपदा असल्याचा उल्लेख करत, प्रकाशित मराठी शब्दकोशातील शब्दसंख्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. मुलांच्या सुरुवातीच्या वयातील बौद्धिक विकासासाठी मातृभाषेतील संवाद महत्त्वाचा आहे. पहिल्या पाच वर्षांत मुलांच्या मेंदूचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने या काळात पालकांनी मुलांशी जास्तीत जास्त मातृभाषेत संवाद साधावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. मातृभाषेतील संवादामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते आणि पुढे अन्य भाषा शिकतानाही त्याचा फायदा होतो, असे त्यांनी सांगितले.