Saturday, October 3, 2026

Nushrratt Bharuccha Health Update : नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल, बालीमध्ये अपघात झाल्यानंतर नुसरतला गंभीर दुखापत

Nushrratt Bharuccha Health Update : नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल, बालीमध्ये अपघात झाल्यानंतर नुसरतला गंभीर दुखापत

Nushrratt Bharuccha Health Update : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बालीमध्ये अपघात झाल्यानंतर नुसरतला गंभीर दुखापत झाली असून, पुढील उपचारांसाठी तिला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं आहे. तिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. नुसरत एका प्रोजेक्टच्या कामासाठी बालीला गेली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ती तिथेच सुट्टीचा आनंद घेत होती. याचदरम्यान तिचा अपघात झाला. अपघातानंतर तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी तिला मुंबईत आणण्यात आलं आहे.

ऑक्सिजन सपोर्टवर दिसली नुसरत भरूचा

मुंबईत दाखल झाल्यानंतर नुसरतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये नुसरतला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेताना दिसत आहे. ती शुद्धीवर असल्याचंही व्हिडीओत दिसून येतं. यावेळी ती ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अपघातामुळे नुसरतला मोठ्या वेदना होत असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून जाणवत आहे. मात्र, तिच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नुसरतला नेमकी दुखापत कशी झाली ?

नुसरतच्या टीमकडून यापूर्वी तिच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली होती. दुखापतीनंतर उपचार आणि शस्त्रक्रियेमुळे तिला काही काळ विश्रांती घ्यावी लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, अपघात नेमका कसा झाला, याचा सविस्तर तपशील त्यावेळी जाहीर करण्यात आला नव्हता. आता नुसरतला मुंबईत आणण्यात आलं असून तिच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया नेमकी कधी होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नुसरतच्या आगामी प्रोजेक्टचं काय ?

नुसरत भरूचा आगामी काळात अभिनेता टायगर श्रॉफसोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या प्रोजेक्टमध्ये दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मात्र, या सिनेमाचं अधिकृत नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. दरम्यान, नुसरत नुकतीच 'उफ ये सियापा' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला होता. सध्या नुसरतच्या चाहत्यांकडून तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. तिच्या प्रकृतीबाबत अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >