सोशल मीडियावर बनावट अकाउंटवरून मुलींना अश्लील मेसेज; आरोपी मंगेश तांबेला कठोर शिक्षा व ६० हजारांचा दंड

सोशल मीडियाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग व मानसिक छळ करणाऱ्या एका विकृत तरुणाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आरोपी मंगेश ईश्वरदास तांबे (वय २८, रा. उत्तन) याला माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३५४(अ) अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची ही रक्कम पीडितांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

सागरी उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी मंगेश तांबे याने डिसेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सायबर गुन्हेगारीचा कुटील डाव रचला होता. त्याने सुरुवातीला फेसबुकवर ‘विद्या’ या नावाने मुलीचे खोटे प्रोफाईल तयार केले आणि फिर्यादी तरुणीला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली. समोरील व्यक्ती मुलगीच आहे असे वाटल्याने फिर्यादीने ती विनंती स्वीकारली. मात्र, चॅटिंगदरम्यान आरोपीने हळूहळू अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली. संशय आल्याने फिर्यादीने थेट व्हिडिओ कॉल केला असता स्क्रीनवर मुलगी नसून एक पुरुष असल्याचे उघड झाले. या प्रकाराने घाबरलेल्या फिर्यादीने त्याचा नंबर तात्काळ ब्लॉक केला.


नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून आरोपी मंगेश तांबे याने फिर्यादीच्याच नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडले. या बनावट खात्यावरून त्याने फिर्यादीची चुलत बहीण आणि तिच्या अल्पवयीन मैत्रिणींना अत्यंत अश्लील मेसेज, फोटो व व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, मुलींना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आणि तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्या लज्जेचे धिंडवडे काढले. अखेर या त्रासाला कंटाळून फिर्यादीने सागरी उत्तन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले.



खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील श्रीमती भामरे-पाटील यांनी अत्यंत प्रभावी युक्तिवाद केला. आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने तब्बल ९ महत्त्वाचे साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे आणि सादर करण्यात आलेले कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. या न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार दिलीप सनेर यांनी मोलाचे सहकार्य केले.


*न्यायालयाचा निकाल व शिक्षा:*


माहिती तंत्रज्ञान अधिनियम (कलम 67 अ): 5 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंड (दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास).
भादंवि (कलम 354 अ - विनयभंग): 3 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड.
पीडितांना दिलासा: न्यायालयाने आरोपीकडून वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.

"सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आणि फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सतर्क राहणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिला व मुलींची विटंबना करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशाराच या निकालातून समाजात गेला आहे.

Comments
Add Comment

Thane Ganesh Idol Photo Ban: विसर्जित गणेशमूर्तींच्या छायाचित्रणावर ठाणे पोलिसांची बंदी; निर्णयाविरोधात पर्यावरण कार्यकर्ते न्यायालयात

ठाणे: यंदाचा गणेशोत्सव हा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत दरवर्षीप्रमाणे थाटामाटात साजरा झाला. परंतु

ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा! ‘युट्युब भाई’ला महिलांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच दिला चांगलाच चोप

ठाण्यातील कोपरी (Kopri, Thane) परिसरात रविवारी रात्री एका विचित्र आणि थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्वतःला स्थानिक

Thane Water Cut : ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! 26 सप्टेंबरला 24 तास पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने (TMC) शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी

Bhiwandi Viral Video : भिवंडीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एकाच ऑटो-रिक्षात कोंबले तब्बल 17 शाळकरी मुले; थरारक व्हिडिओ व्हायरल

भिवंडी : शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीच्या रोशन बाग परिसरातून एक अत्यंत

Thane Fire News : ठाणे जिल्ह्यात आगीच्या ३ वेगवेगळ्या घटना : १४ वीज मीटर, ५ घरे आणि १४ गाड्या जळून खाक

ठाणे : ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरात आगीच्या तीन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने