पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे आंदोलन हे एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन नाही तर राजकीय स्टंटबाजी आणि राजकीय इव्हेंट आहे. यात 80 टक्के राजकीय कार्यकर्त्यांची घुसखोरी असल्याचा आरोप करीत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या पुण्याबाहेरील कार्यकर्त्यांच्या महागड्या गाड्यांचे व्हिडीओ दाखवत सोमवारी या आंदोलनाची पोलखोल केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विद्यार्थ्यांशी खरेच देणेघेणे असेल तर त्यांच्या भवितव्याशी तरी खेळू नका असे आवाहन करत बन म्हणाले, पहिले चार दिवस रोहित पवार यांच्या आंदोलनाकडे विद्यार्थी फिरकलेच नाहीत. त्यामुळे आंदोलनाचा फज्जा उडत असल्याचे पाहून रोहित पवार यांनी फोनाफोनी करून पुण्याबाहेरील आपल्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तिथे बोलावून घेतले. त्यात रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो आणि साखर कारखान्यातील कर्मचारीही आहेत. रसद पुरवण्यात आल्याने राजकीय पक्षांचे झेंडे आणि स्टीकर लावलेल्या 200 ते 250 गाड्यांमधून हे कार्यकर्ते तिथे पोहचले. या बहुतेक गाड्या बारामतीतील आणि पुण्याबाहेरील आहेत आणि पैसे देऊन ही गर्दी जमवण्यात आली आहे.
बन पुढे म्हणाले, रोहित पवार आता ते एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना हटवण्याची मागणी करत आहेत. परंतु पेपरफुटी भीमनवार यांच्या काळात झालेलीच नाही. त्या संदर्भात सहा जणांना अटक झाली. एका सचिवाची बदलीची मागणी होती. तिही झाली आहे. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तीन ते चार शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या. रोहित पवार यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या गटाशीही चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने आपले मन जिंकल्याचे सांगत सगळ्या मागण्या मान्य झाल्याने आता आंदोलन करणार नाही, असे मुंबईत सांगितले. तरीही रोहित पवार आंदोलन का करत आहेत?
https://www.prahaar.in/2026/10/05/private-fishing-contract-for-ujani-dam-cancelled/मुंबईत एकाही आदिवासी विद्यार्थ्याला पोलिसांनी ना ताब्यात घेतले, ना अटक केली. काँग्रेसची ही ओरड म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली. त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने ते शिष्टमंडळ पुन्हा परतीच्या मार्गावर नाशिकला निघाले. काँग्रेसला राजकारण करायचे असेल तर आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करावे. परंतु आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळून काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. देवाभाऊंचे सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेते. आदिवासींना जितक्या सुविधा देवाभाऊंच्या सरकारमध्ये मिळाल्या तितक्या काँग्रेसच्या काळात कधीही मिळाल्या नव्हत्या. उलट काँग्रेसच्या नेत्यांनी आदिवासींच्या संस्था हडप करून, आदिवासींचे अनुदान हडप करून स्वतःची घरे भरली, हा इतिहास असल्याची टीका बन यांनी केली.
रोहित पवारांच्या आंदोलनात विद्यार्थीच नाहीत
काल शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आंदोलनाच्या ठिकाणी गेले तेव्हा देण्यात आलेल्या ‘परत जा, परत जा’, ‘गद्दार, गद्दार’ या घोषणा विद्यार्थ्यांनी नव्हे तर रोहित पवार आणि काँग्रेस आणि संजय राऊत यांच्या मोजक्या चार-पाच कार्यकर्त्यांनी केल्या. ओमराजे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले होते तर एमपीएससीची एकही मागणी ओमराजेंकडे का केली नाही? अध्यक्षांची हकालपट्टी करा किंवा एमपीएससीत सुधारणा करा, अशी मागणी करायला पाहिजे होती. या आंदोलनात विद्यार्थी नसून रोहित पवारांचे कार्यकर्ते घुसले असल्याने ओमराजेंच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे हे रोहित पवारांचे आंदोलन नाही, तर स्टंटबाजी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा भडिमार बन यांनी केला.






