मुंबई : "राज्यात मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही न्याय मिळायला हवा. मच्छिमारांची परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्येक तलावाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधत सरकार म्हणून काय मदत करता येईल, याचा आढावा घेतला जात आहे. वाशीम जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तलावांमधील गाळ काढण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, संबंधित सर्व विभागांना एकत्र घेऊन साधारण महिन्यानंतर ही कामे सुरू करण्याचा विचार आहे", अशी माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी वाशीम येथे माध्यमांशी बोलताना दिली.
वर्षानुवर्षे अनेक धरणे आणि तलावांमधील गाळ काढण्यात आलेला नाही. मोठ्या प्रमाणात साचलेला हा गाळ काढल्यास तलावांची पाणी साठवण क्षमता वाढू शकते, असा अंदाज असल्याने या कामाला प्राधान्य देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत मच्छिमारांनाही आधार देण्याच्या उद्देशाने हा दौरा असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्डच्या प्रस्तावांना बँकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारीही आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. काही बँका मोजक्याच प्रस्तावांना मंजुरी देत असून उर्वरित प्रस्तावांमध्ये त्रुटी काढल्या जात आहेत. सरकारने किसान क्रेडिट कार्ड संदर्भात विशेष शासन निर्णय काढलेला असताना १०० प्रस्ताव पाठविल्यावर फक्त पाच प्रस्तावांना मंजुरी मिळत असेल, तर योजनेचा मच्छिमारांना अपेक्षित लाभ मिळणार नाही. जालना येथे किसान क्रेडिट कार्डच्या विषयामुळे एका मच्छिमाराने आत्महत्या केल्याचा उल्लेख करत, वाशीम जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे राणे यांनी सांगितले.
मुंबई: राज्य सरकारने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील तीन IAS ...
मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के प्रभावीपणे राबविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मच्छिमारांसाठी १ हजार २४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्याचा संपूर्ण वापर मच्छिमारांच्या आर्थिक प्रगतीसाठी व्हावा, या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
राऊतांच्या भविष्यवाण्या कधी खऱ्या ठरल्या?
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी १७ सप्टेंबरनंतर नरेंद्र मोदी सरकार किंवा मोदी पंतप्रधानपदावर राहणार नसल्याचे म्हटल्याबाबत विचारले असता, राणे यांनी राऊतांच्या पूर्वीच्या भाकितांचा संदर्भ दिला. आतापर्यंत त्यांनी केलेली कोणती भविष्यवाणी खरी ठरली, असे एक उदाहरण द्यावे, असे आव्हान देत राणे यांनी सरकार स्थापन झाल्यापासून ते सरकार दोन, चार किंवा सहा महिन्यांत पडेल, असे राऊत होते. मात्र, सरकार अधिक भक्कम होत चालले असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय दत्त यांच्या वक्तव्यावर भाष्य
अभिनेते संजय दत्त यांनी देशातील सुरक्षेच्या परिस्थितीबाबत केलेल्या वक्तव्यावर राणे यांनी आक्षेप घेतला. संजय दत्त यांनी नंतर त्यावर स्पष्टीकरण दिल्याचा उल्लेख करत, कलाकार भारतात राहून मोठे होतात आणि नाव कमावतात. भारतातील सध्याचे सुरक्षिततेचे वातावरण समजून घेण्यासाठी त्यांनी पाकिस्तान तसेच अन्य शेजारी देशांमध्ये काही दिवस राहून पाहावे. त्यानंतर भारत किती सुरक्षित आहे, हे त्यांच्या लक्षात येईल, असे राणे म्हणाले.