
अजय देवगणचा बहुप्रतीक्षित असलेला दृश्यम द कन्क्लुजन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्या दोन भागांच्या भरघोस यशानंतर अंतिम भागातील रहस्य आणि क्लायमॅक्सने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खिळवून ठेवलं. विशेषतः चित्रपटातील उत्कंठावर्धक वळणे आणि धक्कादायक क्लायमॅक्स हा सोशल मीडियावर चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. याच दरम्यान, चित्रपटाचे लेखक आमिल कियान खान यांनी चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित काही मोठे खुलासे केले आहेत.
पटकथा तयार करण्यासाठी १०० हुन अधिक ड्राफ्ट तयार करावे लागले होते आणि शूटिंगदरम्यान क्लायमॅक्स अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याची माहिती खान यांनी दिली. ' स्क्रिप्ट तयार करताना अनेक बदल करावे लागले. इतके ड्राफ्ट तयार झाले की शेवटी त्याचा आकडा आठवणेही कठीण झाले होते. माझ्या कॉम्प्युटरमध्ये फोल्डरमध्ये फोल्डर्स तयार झाले होते. फायलींना 'FINAL', 'FINAL 2', 'FINAL FINAL' आणि 'FINAL PLEASE GOD' अशी नावे दिली होती. मी खरंच अचूक संख्या विसरलो आहे, पण वेगवेगळ्या रूपात १०० पेक्षा जास्त ड्राफ्ट्स नक्कीच तयार केले गेले.' असे आमिल कियान खान यांनी सांगितले.
भारतीय चित्रपट इतिहासात थरारक सिनेमा म्हणून दृश्यमची ख्याती आहे. मल्याळम चित्रपटाच्या कथानकावर बॉलिवूडमध्ये दृष्यम चित्रपट तयार केला. बॉलिवूड ...
खान पुढे म्हणाले, 'चित्रपटाचा सस्पेन्स आणि कथानक बाहेर कुठेही लीक होऊ नये म्हणून क्रू मेंबर्सना संपूर्ण कथेची कल्पना न देता फक्त त्यांच्या दृश्यापुरतीच माहिती दिली जात होती. चित्रपटाचा क्लायमॅक्स बहुतांश टीमपासून गुप्त ठेवण्यात आला होता. ज्याला जेवढी गरज आहे, त्याला तितकीच माहिती दिली जायची. काही जणांना सीन काय आहे हे माहित असायचं पण तो सीन का शूट होत आहे हे माहिती नसायचं. अनेकांनी क्लायमॅक्स जाणून घेण्यासाठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला पण मी हे गुपित कोणाला सांगितलं नाही.'
दृश्यम ३ तयार करताना दृश्यमचा मूळ आत्मा टिकवून ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान होतं, असं खान यांनी सांगितलं. पहिले दोन भाग हिट गेल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या होत्या. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पूर्ण उतरून त्यांना नवीन काहीतरी देण्यासाठी प्रयत्न केल्याचे खान यांनी म्हटले.






