Tuesday, October 6, 2026

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय; टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा घेतला निरोप

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीतने भारतीय महिला संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे

Harmanpreet Kaur steps down as captain :  भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीतने भारतीय महिला संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ती यापुढेही खेळाडू म्हणून भारतीय संघाचा भाग राहणार आहे.

कर्णधारपद सोडताना हरमनप्रीतने भावनिक प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व करताना आलेले अनुभव, कठीण प्रसंग, टीका आणि मिळालेले यश यांचा तिने आपल्या संदेशात उल्लेख केला. संघाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिल्याचेही तिने सांगितले.

हरमनप्रीतने म्हटले की, कर्णधार म्हणून अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले. काही निर्णय समजून घेतले गेले नाहीत, तर काही निर्णय वैयक्तिक पातळीवरही कठीण ठरले. मात्र, संघाला अधिक सक्षम बनवणे आणि युवा खेळाडूंना स्वत:वर विश्वास ठेवण्याची संधी देणे हा प्रत्येक निर्णयामागचा उद्देश होता.

 
View this post on Instagram
 

A post shared by Harmann (@imharmanpreet_kaur)

कर्णधारपद सोडताना समाधान वाटत असल्याचेही हरमनप्रीतने सांगितले. भारतीय महिला संघ सध्या चांगल्या स्थितीत असून संघात गुणवत्ता, आत्मविश्वास आणि चांगले भविष्य असल्याचा विश्वास तिने व्यक्त केला. कर्णधारपदाचा अध्याय संपला असला तरी भारतीय क्रिकेटसोबतचा प्रवास सुरूच राहणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

हरमनप्रीत कौरने मार्च 2009 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017 च्या महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने नाबाद 171 धावांची शानदार खेळी केली होती. तिच्या या खेळीमुळे भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज होण्याचा विक्रमही हरमनप्रीतच्या नावावर आहे. आक्रमक फलंदाजीसोबतच तिने संघाचे नेतृत्व करत भारतीय महिला क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आता कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतर हरमनप्रीत खेळाडू म्हणून संघासाठी योगदान देणार आहे. त्यामुळे तिच्या पुढील क्रिकेट प्रवासाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >