
कल्पना करा, तुम्ही तुमच्या MacBook समोर बसला आहात; मात्र की-बोर्ड किंवा माऊसला हात न लावताच तुमची अनेक कामे पूर्ण होत आहेत. इंटरनेटवर माहिती शोधण्यापासून ते कोडिंग करण्यापर्यंतची जबाबदारी तुमचा कॉम्प्युटर स्वतःच पार पाडत आहे. ही कल्पना लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. कारण Apple आता अशाच एका खास AI Agent वर काम करत आहे. हा AI Agent माणसाप्रमाणे कॉम्प्युटरचा वापर करू शकेल आणि यूजरने दिलेल्या सूचनेनुसार वेगवेगळ्या अॅप्स आणि टूल्सच्या मदतीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
Apple च्या जॉब पोस्टिंगमधून मोठा खुलासा
Apple च्या या नव्या प्रोजेक्टची माहिती Bloomberg च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने अलीकडेच सीनियर इंजिनिअरिंग मॅनेजर पदासाठी नोकरीची जाहिरात दिली आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीवर माणसाप्रमाणे डिव्हाइस हाताळू शकणारा AI Agent विकसित करण्याची जबाबदारी असेल. कंपनीच्या जॉब पोस्टिंगनुसार, हा AI Agent वेब ब्राउझिंग, विविध अॅप्सचा वापर आणि अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण होणारी डिजिटल कामे हाताळू शकेल. एवढेच नाही, तर गरजेनुसार कमांड रन करणे, कोड लिहिणे आणि त्यातील चुका शोधून दुरुस्त करण्यातही तो मदत करू शकणार आहे.
सध्या गेमिंग विश्वात GTA 6 ची मोठी चर्चा सुरू आहे. या गेमची क्रेझ पाहता अनेकजण तो मोफत डाउनलोड करण्यासाठी इंटरनेटवर लिंक शोधत आहेत. मात्र, तुम्हीही GTA 6 ...
कामानुसार स्वतःच निवडणार योग्य टूल
या AI Agent चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो दिलेले काम समजून त्यासाठी आवश्यक असलेले टूल स्वतः निवडू शकेल. उदाहरणार्थ, एखादी माहिती शोधायची असल्यास तो ब्राउझरचा वापर करेल, तर कोडिंगसाठी आवश्यक कमांड आणि टूल्स निवडेल. यामुळे यूजरला प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र सूचना देण्याची किंवा स्वतः अॅप्स उघडून काम करण्याची गरज कमी होऊ शकते. वेगवेगळे अॅप्स, ब्राउझर आणि कमांड लाइन यांच्यात समन्वय साधून काम पूर्ण करण्याची क्षमता या AI Agent मध्ये विकसित करण्याचा Apple चा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रक्रियेत यूजर्सच्या प्रायव्हसीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे थर्ड पार्टी AI Agent वर निर्बंध ?
विशेष म्हणजे, Apple स्वतःचा AI Agent विकसित करत असतानाच इतर कंपन्यांच्या AI Agent ला डिव्हाइसचा पूर्ण अॅक्सेस देण्याबाबत सावध भूमिका घेत आहे. Bloomberg च्या रिपोर्टनुसार, आगामी macOS 27.3 अपडेटमध्ये थर्ड पार्टी AI Agent ला डिव्हाइसचे नियंत्रण देण्यापूर्वी यूजर्सना अलर्ट दाखवले जाऊ शकतात. अशा प्रकारच्या परवानग्या देताना यूजरची संमती आवश्यक असेल, असे Apple ने यापूर्वीच डेव्हलपर्सना स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि प्रायव्हसीच्या दृष्टीने Apple अधिक खबरदारी घेत असल्याचे दिसते.
सध्या प्रोजेक्ट सुरुवातीच्या टप्प्यात
AI Agent च्या क्षेत्रात OpenAI, Anthropic आणि Meta यांसारख्या कंपन्या आधीच काम करत आहेत. त्यामुळे या स्पर्धेत Apple चा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, Apple चा हा प्रोजेक्ट अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.Bloomberg च्या रिपोर्टनुसार, कंपनी 2027 च्या अखेरीस ही सुविधा सादर करण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे. मात्र, याबाबत Apple कडून अद्याप अधिकृत लॉन्चिंग तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. एकंदरीत, Apple चा हा AI Agent प्रत्यक्षात आला, तर कॉम्प्युटर वापरण्याची पद्धतच बदलू शकते. प्रत्येक कामासाठी की-बोर्ड आणि माऊसचा वापर करण्याऐवजी केवळ सूचना देऊन अनेक डिजिटल कामे पूर्ण करण्याचा नवा पर्याय MacBook यूजर्सना मिळू शकतो.





