Tuesday, October 6, 2026

Nashik Crime : खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची मागणी, नाशिकमध्ये माजी विद्यार्थ्याकडून प्राध्यापिकेला ब्लॅकमेल

Nashik Crime : महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेचा ऑनलाइन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. खासगी व्हिडीओ आणि चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत प्राध्यापिकेकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

विश्वास संपादन करून प्राध्यापिकेशी जवळीक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चेतन राजाराम आढे ऊर्फ राठोड हा अंबड, जालना येथील रहिवासी असून, पीडित महिला प्राध्यापिका कार्यरत असलेल्या महाविद्यालयात त्याने यापूर्वी शिक्षण घेतले होते. प्राध्यापिकेची नंतर दुसऱ्या महाविद्यालयात बदली झाली. मात्र, त्यानंतरही चेतनने त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला. हळूहळू विश्वास संपादन करून त्याने प्राध्यापिकेशी जवळीक वाढवली आणि प्रेमसंबंध निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच काळात प्राध्यापिकेचे खासगी स्वरूपाचे व्हिडीओ स्क्रीन रेकॉर्ड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आठ दिवसांच्या सहलीसाठी दबाव

काही दिवसांपूर्वी संशयित आरोपीने प्राध्यापिकेला महाराष्ट्राबाहेर आठ दिवसांच्या सहलीला सोबत येण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. मात्र, प्राध्यापिकेने त्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर आरोपीने खासगी व्हिडीओ आणि चॅट्स सोशल मीडियावर सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच बदनामीची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. प्राध्यापिकेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयिताने त्यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने प्राध्यापिकेच्या बहीण आणि वहिनीलाही अश्लील तसेच धमकीचे संदेश पाठवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या प्राध्यापिकेने अखेर गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गंगापूर पोलिसांकडून आरोपीला अटक

तक्रारीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी संशयित चेतन आढे ऊर्फ राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत असून, खासगी व्हिडीओ, चॅट्स आणि धमकीच्या संदेशांबाबतही तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >